Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

वाघाचा थरारक हल्ला! गुराखी गंभीर जखमी; सावंगी (बडगे) परिसरात भीतीचे वातावरण




गोसेखुर्द कालव्याजवळ वाघाचा हल्ला; ग्रामस्थांच्या धाडसाने गुराख्याचा जीव वाचला, वाघाच्या बंदोबस्ताची मागणी 


चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी वनपरिक्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावंगी (बडगे) येथील एका गुराख्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कांचन प्रकाश खोब्रागडे (वय ३०), रा. सावंगी (बडगे), हे नेहमीप्रमाणे आपल्या म्हशी व बैलांना चराईसाठी जंगल परिसरात घेऊन गेले होते. गोसेखुर्द कालव्याजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला आणि फरफटत नेण्याचा प्रयत्न केला.


यावेळी कांचन खोब्रागडे यांनी आरडाओरडा केल्याने जवळच असलेले रवी वाडगुरे तातडीने घटनास्थळी धावले. त्यांच्या धाडसामुळे जखमी गुराख्याची वाघाच्या तावडीतून सुटका करण्यात यश आले.


घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. दरम्यान, ग्रामस्थांनी जखमीला तळोधी येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सिंदेवाही येथे हलविले आणि पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.


स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही या परिसरात वाघांच्या हल्ल्यात अनेक गुरेढोरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, संबंधित वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.


या घटनेबाबत वनविभागाकडून पुढील तपास आणि आवश्यक कार्यवाही सुरू आहे.


जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी

Post a Comment

0 Comments