Type Here to Get Search Results !

सुसरीच्या महापुराने घेतली मोरीची झडप; जीव मुठीत धरून ग्रामस्थांनी काढले दोन दिवस




अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 

7798185755


सुसरी नदीला आलेल्या महापुराने डहाणू तालुक्यातील पिंपळशेत-निकणे-वधना या मुख्य रस्त्यावरील मोरी पूर्णपणे वाहून गेल्याने निकणे, उर्से आणि वधना गावांचा संपर्क पूर्णतः खंडित झाला. या घटनेमुळे परिसरातील अनेक कुटुंबे दोन दिवस बाहेरील जगापासून तुटून पडली, तर ग्रामस्थांना जीव मुठीत धरून पुराचा सामना करावा लागला.


निकणे-पिंपळशेत पुलापासून सुमारे ५०० मीटर अंतरावरील मोरीवर यापूर्वीच लहान भगदाड पडले होते. मात्र त्याकडे वेळेत लक्ष न दिल्याने सुसरी नदीच्या प्रचंड प्रवाहाने अखेर संपूर्ण मोरी वाहून नेली. त्यामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली आणि गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला.


२२ आणि २३ जुलै रोजी सुसरी नदीवरील निकणे-पिंपळशेत पूल तब्बल २४ तास पाण्याखाली राहिला. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारे गावाबाहेर पडता आले नाही. नदीकाठावरील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे अनेक कुटुंबांनी रात्रभर भीतीच्या छायेत जागून काढली. वीजपुरवठा आणि मोबाईल नेटवर्कही खंडित झाल्याने मदतीसाठी संपर्क साधणेही अशक्य झाले होते.


संपर्क तुटल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची मदत वेळेवर पोहोचली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. स्थानिकांच्या मते, संकटाच्या काळात ग्रामस्थांनीच एकमेकांना आधार देत परिस्थितीचा सामना केला.


परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, गेल्या ५० ते ६० वर्षांतील हा सर्वात मोठा पूर होता. या पुराने गावातील पायाभूत सुविधांची कमकुवतता उघड केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.


घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तुटलेल्या मोरीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली. तसेच भविष्यात अशा पुराचा धोका लक्षात घेऊन मोरीऐवजी कायमस्वरूपी उंच व मजबूत पूल उभारण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. ग्रामस्थांच्या या मागणीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments