Type Here to Get Search Results !

कासा गायकवाड पाड्यात पुराचा वेढा; धाडसी बचावकार्यात चार जणांची सुखरूप सुटका




अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 

7798185755


कासा (ता. डहाणू) : डहाणू तालुक्यात गेल्या १६ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका कासा गावातील गायकवाड पाड्याला बसला. बुधवारी रात्री शंकर गायकवाड यांच्या कुटुंबाला पुराच्या पाण्याने चारी बाजूंनी वेढा घातल्याने चार सदस्य घराजवळील झोपडीत अडकून पडले होते. मात्र स्थानिक तरुण आणि पोलिसांच्या धाडसी बचावकार्यात या चौघांची सुखरूप सुटका करण्यात आली.


बुधवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास शंकर गायकवाड यांच्या घराच्या परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली. दिवसभर शेतीची कामे आटोपल्यानंतर कुटुंब घराशेजारील झोपडीतच थांबले होते. मात्र पावसाचा जोर वाढत गेल्याने काही वेळातच झोपडीला चारी बाजूंनी पुराच्या पाण्याचा वेढा पडला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी गावातील नागरिकांकडे मदतीची हाक दिली.


रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास गावातील तरुण घटनास्थळी एकत्र आले. यावेळी पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्यासह पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. कोणताही विलंब न करता अतुल रावते, प्रेम धोडी, गणेश गायकवाड तसेच इतर स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू केले. सुमारे २० ते २२ फूट खोल आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्यात तीन ते चार तरुणांनी कंबरेला दोरखंड बांधून पुराच्या प्रवाहाला तोंड देत अडकलेल्या झोपडीजवळील झाडाला दोरखंड बांधला. दुसऱ्या बाजूला गावातील तरुणांनी तो दोरखंड घट्ट पकडून ठेवला. त्यानंतर ट्यूबच्या साहाय्याने सुमारे १०० मीटरहून अधिक अंतर पार करत शंकर गायकवाड यांच्या कुटुंबातील चारही सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.


बचावकार्य सुरू असतानाच पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याचे लक्षात येताच पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी स्वतः वाहत्या पाण्यात उतरून बचाव मोहिमेत सहभाग घेतला. स्थानिक तरुण आणि पोलिसांच्या समन्वयामुळे हे धाडसी बचावकार्य यशस्वी झाले असून कोणतीही जीवितहानी टळली.


दरम्यान, डहाणू तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. डहाणू–जव्हार मार्गावरील कासा व चारोटीदरम्यान मुख्य राज्य मार्ग काही ठिकाणी पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही तास ठप्प झाली होती. तसेच कासा–सायवन राज्य मार्गावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हा मार्ग संपूर्ण रात्र वाहतुकीसाठी बंद राहिला.

Post a Comment

0 Comments