व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
9209982212
गावात नवीन वीज जनित्र बसविले कमी दाब व वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यातून मिळणार दिलासा
अहेरी:-तालुक्यातील ग्रामपंचायत नागेपल्ली अंतर्गत येणाऱ्या पुसुकपल्ली गावातील नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा करून केलेल्या मागणीला अखेर यश आले असून गावात नवीन व अधिक क्षमतेचे वीज जनित्र (ट्रान्सफॉर्मर) बसविण्यात आले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून कमी दाबाचा वीजपुरवठा, वारंवार वीज खंडित होणे आणि ट्रान्सफॉर्मरवर वाढलेल्या भारामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांमधून गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गावातील विद्यमान ट्रान्सफॉर्मरवर क्षमतेपेक्षा अधिक भार पडत असल्याने तो वारंवार बिघडत होता. परिणामी अनेक तास वीजपुरवठा खंडित राहत होता. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर बनली होती. घरगुती वीजपुरवठ्यासह शेतीपंप, लहान व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा मोठा परिणाम होत होता.
या समस्येची गंभीर दखल घेत गावकऱ्यांनी महावितरण विभागाकडे निवेदन सादर करून नवीन व अधिक क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्याची जोरदार मागणी केली होती. निवेदनानंतर महावितरणचे अभियंता श्री. शेंडे यांनी लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विभागाने तातडीने कार्यवाही करत पुसुकपल्ली येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविला.
नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यामुळे गावातील कमी दाबाची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वारंवार होणारे वीज खंडित होणे कमी होऊन घरगुती वापर, शेती सिंचन, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच व्यावसायिकांचे कामकाज सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
महावितरण विभागाने ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने कार्यवाही केल्याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यातही गावातील वीजपुरवठा अखंडित व दर्जेदार ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी राकेश कोसरे, राकेश कुळमेथे, उमेश डोके, संतोष येल्लूर, कृष्णकांत झनकापुरे, मल्लेश चौधरी, अंकुलू भोयर, नागोराव भोयर, श्रीकांत भोयर, चंद्रय्या झनकापुरे, अशोक चौधरी, मल्लेश केरकर यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments