मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत दोन ठिकाणी चरणसेवा उपक्रमांचे आयोजन
मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
8208166961/9860020016
अहिल्यानगर, दि. ११ :- आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा पायी प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत 'चरणसेवा' उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पी. व्ही. बेल्हेकर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, नेवासा तसेच डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज यांच्या माध्यमातून दोन ठिकाणी चरणसेवा व आरोग्य सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
श्री रोकडोबा हनुमान दिंडी, बेलपिंपळगाव येथील आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी उस्थळ दुमला येथे पी. व्ही. बेल्हेकर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, नेवासा यांच्या वतीने चरणसेवा उपक्रम राबविण्यात आला. तसेच आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त विविध पायी दिंड्यांमधील वारकऱ्यांसाठी अहिल्यानगर येथील मार्केट यार्ड परिसरात डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज यांच्या माध्यमातून चरणसेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दोन्ही ठिकाणी वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी आयुर्वेदिक औषधी तेलाच्या साहाय्याने चरणसेवा करण्यात आली. पायांना औषधी तेलाने मसाज केल्यामुळे दीर्घ पायी प्रवासामुळे आलेला ताण व थकवा कमी होण्यास मदत झाली. त्यामुळे पुढील प्रवासासाठी वारकऱ्यांना नवचैतन्य लाभले.
यावेळी वारकऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमांमध्ये संबंधित वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, विद्यार्थी आणि स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वारकऱ्यांना आपुलकीने, तत्परतेने आणि सेवाभावाने चरणसेवा उपलब्ध करून देण्यात आली.
या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अहिल्यानगर मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे डॉ. रेहान शाह आणि स्वप्नील कच्छवे यांनी संबंधित संस्थांशी समन्वय साधून नियोजन व आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
चरणसेवा या सेवाभावी उपक्रमामुळे पायी प्रवासातील थकवा कमी होऊन पुढील वाटचालीस मोठा आधार मिळाल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष तसेच पी. व्ही. बेल्हेकर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, नेवासा आणि डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज येथील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, विद्यार्थी, स्वयंसेवक आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
या उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित वैद्यकीय संस्थांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments