✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा 📱मो. नं.9373472847 /8888519894
भंडारा (गोबरवाही ) : (दिनांक ७ जुलै २०२६ )तुमसर तालुक्यातील गोबरवाही जवळील 'हेटी' जंगलात मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाला. वाघाने अचानक गुराख्यावर हल्ला केला आणि त्याला ओढत जंगलात नेले. मुलाच्या डोळ्यादेखतच हा थरारक प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुमसर वनपरिक्षेत्रातील बपेरा क्षेत्रातील सोदेपूर राखीव वनपरीक्षेत्रात ही घटना दुपारी १:३० वाजताच्या सुमारास घडली. बेनीराम लक्ष्मण राऊत (५५ वर्षे, हेटी) असे मृत गुराख्याचे नाव आहे. आपला ३५ वर्षीय मुलगा, विजय बेनीराम राऊत यांच्यासह नेहमीप्रमाणे ते जनावरे चरायला घेऊन जंगलात गेले होते. जनावरे चारत असतानाच झुडपातून बाहेर आलेल्या वाघाने बेनीराम राऊत यांच्यावर हल्ला केला. अगदी विजयच्या डोळ्यापुढेच हा प्रकार घडल्याने तो हादरून गेला. त्याने जीवाच्या आकांताने आरडारोरड केला असता जवळपास असणारे गुराखीही धावून आले. मात्र तोपर्यंत वाघाने हल्ला करून बेनीराम यांना सुमारे ५०० फुट अंतरावरील नाल्याच्या काठावर ओढत नेले होते.
वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. मृताच्या कुटुंबियांना तत्काळ १० हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश दिला. २५ लाख रुपयांचा निधी उद्या दिला जाणार आहे.
या घटनमुळे गोबरवाही आणि लगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगलाला लागून असलेल्या गावांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवावी आणि या भागात वाढत्या वन्यप्राण्यांच्या हालचालींवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
*डोळ्यादेखत नेले ओढत*
ही भयावह घटना मुलाच्या अगदी डोळ्यापुढेच घडली. त्याच्या माहितीनुसार, वाघाने थेट हल्ला करून बेनीराम यांचा गळा पकडला, त्यानंतर " ओढत नाल्याकडे नेले. आपल्या वडिलांना वाघ ओढून नेतानाही पाहूनही तो काहीच करू शकला नाही.
*प्रेत होते नाल्याच्या पाण्यात*
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पहाणी केली असता बेनीराम यांचे प्रेत नाल्यात पडलेले होते. मान पूर्णत: छिन्नविछीन्न झाली होती. प्रेत बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रवाना केले.
दोन दिवसांपूर्वीच वाघाने गायीवर हल्ला करून ठार केले होते. त्यामुळे या परिसरात वाघाचा वावर असल्याची चर्चा होती. ही घटना ताजी असतानाच हा जीवघेणा प्रकार घडला.

Post a Comment
0 Comments