Type Here to Get Search Results !

शाळेत मधल्या सुट्टीत धावताना अचानक कोसळल्याने ८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू.



त्रिशा राऊत नागपूर जिल्हा क्राईम रिपोर्टर मो 9096817953

 नागपूर.नागपूर शहरातील जरीपटका परिसरातील राजकुमार केवलरामाणी हायस्कूलमध्ये तिसरी तिसऱ्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेत प्रकृती बिघडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी घडली.या घटनेमुळे शाळा परिसरासह संपूर्ण भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, खणीत कटरे हा विद्यार्थी राजकुमार केवलरामाणी हायस्कूलमध्ये तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. बुधवारी दुपारच्या सुट्टीदरम्यान तो इतर विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या मैदानात असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. घटनेची माहिती मिळताच शिक्षक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी खणीतला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. मुलाच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.मृत विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, 'खणीत सकाळी घरून पूर्णपणे ठणठणीत अवस्थेत शाळेत गेला होता. तो जेवण करूनच घरातून निघाला होता. शाळेतही त्याची प्रकृती ठीक होती. मात्र, दुपारी अचानक शाळेतून फोन आला आणि तो मैदानात बेशुद्ध पडल्याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला योग्यवेळी आवश्यक वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत. तसेच शाळा प्रशासनाने पुरेशी तत्परता दाखवली नसल्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा त्यांचा दावा आहे. माझा जीव गेलाय, या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी', अशी मागणी त्यांनी केली आहे.तर दुसरीकडे, शाळा प्रशासनाने विद्यार्थ्याला चक्कर आल्यानंतर तातडीने रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगितले आहे. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होईल, असे शाळेकडून सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांकडून आणि संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू असून, शवविच्छेदन अहवाल आणि प्राथमिक तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments