मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
8208166961/9860020016
गोंदिया, दि.14 :- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ व सुधारणा अधिनियम २०१५ संदर्भात नागरिकांना सविस्तर माहिती मिळावी आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने नागरी हक्क संरक्षण विभाग, गोंदिया यांच्या वतीने ११ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात नागरिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेची सुरुवात प्रमुख पाहुणे तथा अध्यक्ष नरेश वाळके (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर) यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी उद्घाटक म्हणून पोलीस उपअधीक्षक (गृह) सुनील दरेकर उपस्थित होते.
कार्यशाळेत नरेश वाळके यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, सक्षमीकरण आणि सन्मान यावर मार्गदर्शन केले. अॅड. मंगला बनसोड यांनी ॲट्रॉसिटी कायद्याची ओळख व अंमलबजावणी याबाबत सविस्तर माहिती दिली, तर अॅड. कृष्णाजी पारधी यांनी पोलीस पाटील यांची भूमिका आणि समाजातील सध्याची परिस्थिती यावर विश्लेषण मांडले. शुद्धोधन सहारे यांनी कायद्यांतर्गत शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची माहिती दिली. पोलीस अंमलदार प्रभाकर पालांदुरकर यांनी सायबर गुन्ह्यांविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेला गोंदिया जिल्हा पोलीस दल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, समाजकल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच २०९ पोलीस पाटील आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यशाळा पोलीस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण, नागपूर परिक्षेत्र) लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक पोलीस निरीक्षक तिर्थदास निंबेकार व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कार्यशाळेचे प्रास्ताविक संगिता शरणागत यांनी केले, सूत्रसंचालन श्रीमती तरोणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन तिर्थदास निंबेकार यांनी मानले.

Post a Comment
0 Comments