बीपी डायबिटीज आणि हृदयविकाराची ३९ औषधे होणार स्वस्त !
✍️ भवन लिल्हारे भंडारा, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी📱 मो.नं.9373472847 /8888519894
भंडारा : (दिनांक १२ जुलै २०२६) उच्च रक्तदाब (बीपी), मधुमेह, हृदयविकार, HIV किंवा डोळ्यांच्या संसर्गावरील औषधे घेणाऱ्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने ३९ अत्यावश्यक औषधांच्या कमाल किरकोळ किंमती (Retail Price) निश्चित केल्या आहेत. त्यामुळे आता ही औषधे सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त किमतीत विकता येणार नाहीत. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण (NPPA) मार्फत हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे रुग्णांवरील उपचारांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे .
*३९ औषधांच्या कमाल किरकोळ किंमती निश्चित*
केंद्र सरकारने राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण (NPPA) मार्फत उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, HIV आणि डोळ्यांच्या संसर्गावरील औषधांसह ३९ नव्या औषधांच्या फॉर्म्युलेशनच्या कमाल किरकोळ किंमती निश्चित केल्या आहेत. ८ जुलै रोजी रसायन आणि खत मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ड्रग्स (प्राइस कंट्रोल) ऑर्डर, २०१३ (DPCO) अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या मते, अत्यावश्यक औषधे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे आणि उपचारांचा खर्च कमी करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे"
*कोणत्या आजारांवरील औषधांचा समावेश?*
*सरकारने निश्चित केलेल्या किंमतींमध्ये खालील आजारांवरील औषधांचा समावेश आहे.*
उच्च रक्तदाब (High Blood Pressure)
मधुमेह (Diabetes)
हृदयविकार (Heart Disease)
HIV
डोळ्यांतील संसर्ग (Eye Infections)
या निर्णयामुळे या गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या लाखो रुग्णांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे."
*जास्त किंमत आकारल्यास कठोर कारवाई*
सरकारने स्पष्ट केले आहे की, औषध उत्पादक कंपनी किंवा विक्रेता जर निश्चित केलेल्या कमाल किंमतीपेक्षा जास्त पैसे आकारत असेल, तर त्याला ग्राहकांकडून वसूल केलेली अतिरिक्त रक्कम परत जमा करावी लागेल. याशिवाय त्या रकमेवर व्याजही भरावे लागणार आहे. ही कारवाई ड्रग्स (प्राइस कंट्रोल) ऑर्डर, २०१३ आणि आवश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत केली जाणार आहे. त्यामुळे औषध कंपन्या किंवा विक्रेते मनमानी दर आकारू शकणार नाहीत.
*मेडिकल स्टोअरसाठीही नवा नियम*
NPPA ने सर्व मेडिकल स्टोअर आणि औषध विक्रेत्यांना दवांच्या किंमतींची अधिकृत यादी दुकानात ग्राहकांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावणे बंधनकारक केले आहे. यामुळे ग्राहकांना औषधांची अधिकृत किंमत सहज समजेल आणि जादा दर आकारण्याच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. तज्ज्ञांच्या मते, अत्यावश्यक औषधांच्या कमाल किरकोळ किंमती निश्चित करण्याच्या निर्णयामुळे उपचाराचा खर्च कमी होईल. विशेषतः दीर्घकालीन आजारांवर नियमित औषधे घेणाऱ्या रुग्णांना याचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

Post a Comment
0 Comments