Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पोलीस व एस्.टी कर्मचाऱ्यांना काँलेज विद्यार्थिनी खऱ्या रक्षकांना राखी बांधून कृतज्ञता केली व्यक्त.



तळा :किशोर पितळे: (प्रतिनिधी)

तळा :- रक्षाबंधन म्हणजे काय? फक्त एक धागा? नाही... तर हा आहे विश्वासाचा, सुरक्षेचा आणि जन्मभर साथ देण्याचा एक पवित्र संकल्प. आपल्या संस्कृतीत रक्षाबंधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याची शपथ घेतो. हा सण रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन माणुसकीचे नाते जपण्याची शिकवण देतो. आणि याच शिकवणीचा प्रत्यय नुकताच आपल्या तळा शहरात पाहायला मिळाला. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी यंदाचे रक्षाबंधन अविस्मरणीय केले आहे. घरचा सण,कुटुंबाची ओढ बाजूला ठेवून, उन्हा-पावसात २४ तास आपल्यासाठी रस्त्यावर उभे असणाऱ्या, आपल्या रक्षणासाठी जागे असणाऱ्या पोलीस बांधवांना या लाडक्या बहिणींनी राखी बांधली. तो क्षणच इतका भावूक होता की, कणखर पोलिसांचेही डोळे पाणावले.

"तुम्ही आमचे रक्षण करता, आम्ही तुमच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतो"  हीच निरागस भावना त्या चिमुरड्या बहिणींच्या चेहऱ्यावर होती. पोलीस बांधवांनीही त्यांना हक्काचा आशीर्वाद देत, "तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची" असे वचन दिले. हा उपक्रम इथेच थांबला नाही. दिवस-रात्र आपल्याला सुखरूप घरी पोहोचवणाऱ्या आपल्या लालपरीच्या, म्हणजेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही या विद्यार्थिनींनी राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. कुटुंबापासून दूर राहणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांसाठी ही राखी म्हणजे मायेची एक मोठी शाबासकीच होती. इतकंच नाही, तर आपल्याच कनिष्ठ महाविद्यालयातील वर्गमित्रांना राखी बांधून या विद्यार्थिनींनी कॉलेजमध्येही बहीण-भावाचे पवित्र नाते आणि सुरक्षित वातावरण निर्माण केले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.खरंच, समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणणारा आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा तळा ज्युनियर कॉलेजचा हा उपक्रम कौतुकास्पदच आहे.

Post a Comment

0 Comments