Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना ऑनलाइन सन्मानपत्र देण्याबाबत महापौर सकारात्मक



✍️दिलीप करकरे✍️

माणगाव, रायगड 

7208708456

ठाणे:- ठाणे शहरात येत्या ३० ऑगस्ट रोजी ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे यंदाही देश-विदेशातील तसेच विविध भागांतील हजारो धावपटू, विविध वयोगटातील स्पर्धक आणि शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

कोरोना काळानंतर तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ठाणे महापौर पदाची नियुक्ती झाल्याने यंदाच्या मॅरेथॉन स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे ही स्पर्धा अधिक उत्साहात आणि व्यापक स्वरूपात पार पडणार आहे.

या पार्श्वभूमीवर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला ऑनलाइन पद्धतीने डिजिटल सन्मानपत्र देण्यात यावे, अशी अभिनव संकल्पना अंकुश रामचंद्र जोष्टे यांनी मांडली. याबाबत त्यांनी लोकमान्य नगरचे तरुण, सुसंस्कृत व सुज्ञ नगरसेवक प्रशांत (राजा) जाधवर यांना पत्र देऊन मागणी केली होती.

स्पर्धेतील सर्व स्पर्धकांची नावे व नोंदणी क्रमांक आयोजकांकडे उपलब्ध असतात. त्यामुळे त्या माहितीच्या आधारे प्रत्येक सहभागीला डिजिटल सन्मानपत्र देणे सहज शक्य होऊ शकते. या सन्मानपत्रामुळे प्रत्येक स्पर्धकाच्या मनात मॅरेथॉनची कायमस्वरूपी आठवण राहणार असून, ते सन्मानपत्र विविध सोशल मीडिया माध्यमांवरही सहज शेअर करता येणार आहे.

डिजिटल सन्मानपत्रामुळे वेळ वाचण्यासोबतच आर्थिक खर्चातही कपात होणार आहे. तसेच कागदाची बचत होऊन पर्यावरणपूरक उपक्रमाला चालना मिळेल. सन्मानपत्र गहाळ होण्याची शक्यताही राहणार नाही आणि भविष्यात आवश्यकतेनुसार ते ऑनलाइन पद्धतीने पुन्हा मिळवता येणार आहे.

अंकुश जोष्टे यांची ही कल्पना नगरसेवक प्रशांत (राजा) जाधवर यांना आवडली. त्यांनी या मागणीचे कौतुक करत तत्परतेने दखल घेतली. आपल्या लेटरहेडवर अंकुश जोष्टे यांच्या पत्राची प्रत जोडून मागणीचा स्पष्ट उल्लेख केला आणि ठाणे महापौर शर्मिला पिंपोळकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना पत्र साद केले.

यावेळी माजी नगरसेवक दिगंबर ठाकूर आणि प्रसिद्ध समाजसेवक पुरुषोत्तम ठाकूर उपस्थित होते. तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटोळे यांचे या उपक्रमासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

या मागणीवर ठाणे महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे यंदाच्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या हजारो स्पर्धकांना डिजिटल सन्मानपत्र मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून स्पर्धकांचा सन्मान करण्यासोबतच वेळ, खर्च आणि कागदाची बचत करणारी ही संकल्पना निश्चितच कौतुकास्पद आहे. पारंपरिक सन्मानपत्राला आधुनिक डिजिटल स्वरूप देण्याचा हा उपक्रम भविष्यातील विविध क्रीडा स्पर्धांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतो.

या सकारात्मक प्रतिसादाबद्दल अंकुश रामचंद्र जोष्टे यांनी नगरसेवक प्रशांत (राजा) जाधवर तसेच ठाणे महापौर शर्मिला पिंपोळकर यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Post a Comment

0 Comments