Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

आल्लापल्ली येथे वर्षावास प्रवचन मालिकेचे तिसरे पुष्प उत्साहात संपन्न.



बौद्ध लेणी, स्तंभलेख व शिलालेख विषयावर डॉ. शैलजा गोरेकर-जगताप यांचे अभ्यासपूर्ण प्रवचन

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809.

आल्लापल्ली, दि. ९ ऑगस्ट : संघमित्रा बौद्ध विहार, आल्लापल्ली येथे वर्षावास प्रवचन मालिकेचे तिसरे पुष्प रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजता धम्ममय वातावरणात उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित उपासक-उपासिकांनी सामूहिक त्रिशरण, पंचशील, भीमस्तुती व धम्मपालन गाथेचे वंदन केले.

यानंतर आयु. शकुंतला दुर्गम यांनी भीमगीत सादर केले. वर्षावास प्रवचन मालिकेतील तिसरे पुष्प “बौद्ध लेणी, स्तंभलेख व शिलालेख” या विषयावर डॉ. शैलजा गोरेकर-जगताप यांनी विविध ग्रंथांच्या संदर्भांसह अभ्यासपूर्ण प्रवचन दिले. बौद्ध लेणी, स्तंभलेख व शिलालेख यांचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धम्मविषयक महत्त्व त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले.

प्रवचनादरम्यान उपासक-उपासिकांकडून दहा मिनिटांची आनापानसती साधना करून घेण्यात आली. यावेळी आनापानसतीचे महत्त्व व दैनंदिन जीवनातील उपयोग स्पष्ट करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. प्रणाली दुर्गे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयु. ईश्वरीताई तावडे यांनी केले. कार्यक्रमानंतरच्या नाश्त्याचे दान आयु. नागसेन जगताप साहेब यांनी दिले.

वर्षावासाच्या पवित्र पर्वानिमित्त आयोजित या धम्म प्रवचन मालिकेला बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, आल्लापल्ली; भारतीय बौद्ध महासभा, गडचिरोली (दक्षिण); भारतीय बौद्ध महासभा, गडचिरोली (दक्षिण) महिला शाखा; भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा अहेरी; महामाया महिला मंडळ, आल्लापल्ली आणि बहुउद्देशीय महिला मंडळ, आल्लापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

संघमित्रा बौद्ध विहाराचे अध्यक्ष आयु. कार्तिक निमसरकार साहेब तसेच भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयु. बानयाजी दुर्गम सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व उपासक-उपासिकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments