अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
मो. 7798185755
झरी : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत झरी येथील ज्ञानमाता सदन संस्थेच्या ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेने माणुसकीचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला. 'एक हात मदतीचा' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या खाऊच्या पैशातून, तर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि फातिमा सिस्टर्स यांनी स्वयंस्फूर्तीने योगदान देत तलासरी तालुक्यातील गिरगाव भुजाडपाडा येथील सुमारे ६० ते ६५ पूरग्रस्त आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
२२ आणि २३ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरगाव भुजाडपाडा परिसरातील अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. ही परिस्थिती लक्षात घेऊन ज्ञानमाता शाळेने यंदाचा जागतिक आदिवासी दिन सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी पूरग्रस्त आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला.
प्राचार्या सिस्टर बस्तियान फर्नांडिस यांनी "गरजू आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी आदिवासी दिन साजरा करूया" ही संकल्पना मांडताच विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालक आणि फातिमा सिस्टर्स यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून मदतीसाठी योगदान दिले, तर बहिस्थ विद्यार्थ्यांनी "आपला एक घास दुसऱ्यासाठी" या भावनेतून मदतीचा हात पुढे केला. लहानग्यांच्या या सेवाभावी कृतीने उपस्थितांचे डोळे पाणावले.
संकलित निधीतून अन्नधान्य, किराणा साहित्य आणि इतर अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करून शाळेचे शिक्षक व विद्यार्थी स्वतः पूरग्रस्त गावात पोहोचले. त्यांनी मदतीचे साहित्य वितरित करण्याबरोबरच संकटग्रस्त कुटुंबांना मानसिक आधार देत "तुम्ही एकटे नाही" हा विश्वासही दिला.
या उपक्रमामागे संस्था संचालक विनोद मेढा, प्राचार्या सिस्टर बस्तियान फर्नांडिस, फातिमा सिस्टर्स, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान राहिले. विनोद मेढा यांनी पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे अनेक आदिवासी कुटुंबांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत, ज्ञानमाता शाळेचा हा समाजाभिमुख उपक्रम इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. तर गिरगावचे सरपंच लक्ष्मण घोरखना यांनी गावकऱ्यांच्या वतीने शाळेचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने केवळ मदतीचे साहित्यच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या मनातील सेवाभाव, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचेही दर्शन घडवले. लहान हातांनी केलेल्या या मोठ्या कार्याने अनेक पूरग्रस्त आदिवासी कुटुंबांच्या आयुष्यात आशा, विश्वास आणि माणुसकीचा नवा दीप प्रज्वलित केला.

Post a Comment
0 Comments