पूरप्रवण भागातील नागरिकांचे सर्वेक्षण, पुनर्वसन, जनजागृती आणि बचाव यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सूचना
मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
गडचिरोली : - बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेताना त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम रमेश, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सहपालकमंत्री यांनी पूरप्रवण भागातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेत नागरिकांना वेळेवर सतर्क करणे, पूराचा इशारा मिळताच त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणे आणि बचाव कार्यात कोणताही विलंब होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
नदीकाठील तसेच पूररेषेतील (ब्लू लाईन व रेड लाईन) वस्तींचे सर्वेक्षण करून तेथील नागरिकांची अद्ययावत माहिती तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वारंवार पूराचा धोका असलेल्या कुटुंबांची 'मास्टर लिस्ट' तयार करून त्यांच्या सुरक्षित पुनर्वसनासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
पूरपरिस्थितीत बचाव कार्य अधिक प्रभावी होण्यासाठी बोटी, लाईफ जॅकेट्स, लाईफ रिंग्स, दोरखंड यांसह आवश्यक साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याबरोबरच एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन व पोलिसांची बचाव पथके सतत सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बदलत्या हवामानामुळे एक ते दोन तासांत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याने पारंपरिक नियोजनात बदल करून नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पूरप्रवण गावांमध्ये जनजागृती अभियान राबवून नागरिकांना पूरकाळातील सुरक्षिततेचे प्रशिक्षण देणे, स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करणे आणि आवश्यकतेनुसार लाईफ जॅकेटचे वितरण करण्याच्याही सूचना ही या वेळी देण्यात आली.

Post a Comment
0 Comments