Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

राजाराम येथील अर्का कुटुंबीयांना तेरवी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत; फोनद्वारे साधला संवाद, कठीण प्रसंगी दिला धीर.



मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी: - अहेरी तालुक्यातील राजाराम (खांदला) येथील जीवन सखाराम अर्का (वय २८) यांचे कावीळ (पिलीया) या आजाराने उपचारादरम्यान दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुटुंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने अर्का कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.

या दुःखद प्रसंगी माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अर्का कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत तेरवी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत पाठवून माणुसकीची जपणूक केली. भाजपचे अहेरी तालुका अध्यक्ष विकास तोडसाम आणि भाजप जिल्हा सचिव अभिजित शेंडे यांच्या माध्यमातून ही मदत अर्का कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यात आली.

जीवन अर्का हे आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. अल्पवयातच त्यांचे निधन झाल्याने कुटुंबीयांवर मोठे दुःख कोसळले आहे. अशा कठीण प्रसंगी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

दरम्यान, राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दूरध्वनीद्वारे अर्का कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या दुःखाची आस्थेने विचारपूस केली. जीवन यांच्या निधनाबद्दल त्यांनी दुःख व्यक्त करून कुटुंबीयांना या कठीण प्रसंगात धीर दिला. दुःखाच्या काळात कुटुंबीयांनी खचून जाऊ नये, अशी भावना व्यक्त करत पुढील काळातही कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक भासल्यास आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासन त्यांनी दिले.

राजकारणापलीकडे जाऊन दुःखाच्या प्रसंगी सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका राजे अम्ब्रिशराव आत्राम सातत्याने घेत असल्याचे या मदतीतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. गरजू कुटुंबांना संकटाच्या काळात आधार देणे, त्यांच्या दुःखात सहभागी होणे आणि शक्य ती मदत करणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याची भावना यावेळी व्यक्त होत आहे.

जीवन अर्का यांच्या निधनाने राजाराम परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments