मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी : तालुक्यातील अत्यंत महत्वाचा असलेला अहेरी - इंदाराम - व्येंकटापूर - अवलमरी हा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड खराब झाला आहे.रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.या रस्त्याने शाळकरी विद्यार्थी,शेतकरी आणि रुग्णांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी 9 वाजता व्यंकटरावपेठा, इंदाराम येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांनी रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्यांमध्ये धानाची रोपे रोवून अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा निषेध केला.रस्त्याची चाळण झाली,आता शेतच करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेस नेते हनुमंतू मडावी यांनी केले.कंकडालवारांचा नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले होते.
आंदोलनाची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग,आलापल्ली येथील संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ आंदोलन स्थळी धाव घेतली.आंदोलकांशी चर्चा करून येत्या 15 दिवसांच्या आत या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस योग्य करण्यात येईल, असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.त्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी बोलताना अजय कंकडालवार म्हणाले,गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही या रस्त्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करत आहोत.पण प्रशासन झोपले आहे.आज आम्हाला लेखी आश्वासन मिळाले आहे.जर 15 दिवसात काम सुरू झाले नाही,तर पुढचे आंदोलन हे रस्त्यावर नाही तर थेट PWD कार्यालय,आलापल्ली येथे घेराव घालून करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
या आंदोलनामुळे अहेरी-इंदाराम मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.आंदोलन यशस्वी झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी काँग्रेस नेते हंनमतू मडावी, तालुका अध्यक्ष अज्जू पठाण,माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सौ. सुरेखा आलाम,माजी जि. प. सदस्य अजय नैताम, माजी. जि. प सदस्या कु. सुनीता कुसानाके,सर्व आजी माजी जि. प. प. स. तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments