Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

भजन-कीर्तनाच्या सुरात दुमदुमले मुक्ताईनगर; खडसे यांच्या अमृत महोत्सवाला भक्तीची रंगत



✍️श्री.निलेश सोनवणे✍️

(जिल्हा प्रतिनिधी जळगांव)

जळगाव : माजी आमदार तथा माजी मंत्री श्री. एकनाथराव खडसे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिराच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेला अमृत महोत्सव सोहळा भक्तिरसात रंगला. जन्मदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त भजन व कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिगीतांच्या सुरांनी आणि कीर्तनाच्या निरूपणाने संत मुक्ताई मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. उपस्थित भाविकांनी मोठ्या उत्साहाने या भक्ती सोहळ्याचा आनंद घेतला.

मुक्ताईनगरच्या आराध्य दैवत असलेल्या संत मुक्ताईच्या चरणी नतमस्तक होत खडसे कुटुंबीयांनीही या भक्तिमय सोहळ्यात सहभाग नोंदविला. संत मुक्ताई मंदिरात एकनाथराव खडसे यांच्यासह मंदाताई खडसे, रक्षाताई खडसे व रोहिणीताई खडसे हे भक्तिरसात तल्लीन झाले होते.

यावेळी खडसे कुटुंबीयांनी फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला. एकनाथराव खडसे, मंदाताई खडसे, रक्षाताई खडसे व रोहिणीताई खडसे यांच्या फुगडीच्या फेराने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. भक्ती, परंपरा आणि कौटुंबिक आनंदाचा सुंदर संगम या प्रसंगी पाहायला मिळाला.

एकनाथराव खडसे यांच्या ७५ व्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या अमृत महोत्सव सोहळ्याला धार्मिकतेची आणि आपुलकीची विशेष किनार लाभली. भजन-कीर्तनाच्या सुरांसह भक्तिरसात रंगलेला हा सोहळा मुक्ताईनगरकरांसाठी अविस्मरणीय ठरला.

Post a Comment

0 Comments