✍️ दिलीप करकरे ✍️
माणगाव, रायगड
7208708456
मुंबई, शिवडी :- गेली तब्बल ४० वर्षे सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जपत विविध उपक्रम राबविणाऱ्या ‘हरी बोल बाल मित्र मंडळ’ व ‘ओम साई दरबार सेवा समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी सराव शिबिर २०२६ चे आयोजन शिवडी परिसरातील गणेशबाग येथील पटांगणात करण्यात आले. या सराव शिबिराला गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सामाजिक | आरोग्य | शैक्षणिक | कला | क्रीडा या पंचसूत्रीच्या माध्यमातून मंडळ वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असून, परिसरातील नागरिकांसाठी मंडळ हे केवळ उत्सवाचे केंद्र न राहता सामाजिक बांधिलकी जपणारे व्यासपीठ म्हणून ओळखले जाते.
गेली १० वर्षे दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन मंडळाच्या वतीने सातत्याने केले जात आहे. गतवर्षी तब्बल ५० गोविंदा पथकांनी सराव शिबिरात सहभाग घेतला होता, तर यावर्षीही ३० गोविंदा पथकांनी हजेरी लावत शिबिराची रंगत वाढवली. गोविंदांच्या उत्साहाने संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.
मंडळाच्या सामाजिक कार्याची परंपरा केवळ दहीहंडीपुरती मर्यादित नसून, गरीब व अनाथ मुलांना दीपावलीनिमित्त पुस्तके व कपडे वाटप, तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम नियमितपणे राबविले जातात. महिलांसाठी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन, तसेच मागील वर्षी नमनाचा कार्यक्रम आयोजित करून लोककला आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न मंडळाने केला.
मंडळाच्या नवरात्रोत्सवाचीही परिसरात विशेष ओळख आहे. ‘हरी बोल नवरात्र मंडळ’ यांच्या वतीने देवीचा भव्य मांड उभारला जातो. सुस्वर भजन, लहान मुलांचे नृत्य, देवीचे भव्य आगमन आणि आकर्षक गरबा नृत्य यामुळे नवरात्रोत्सवाला विशेष रंगत प्राप्त होते. विशेष म्हणजे मंडळाचा नवरात्रोत्सव हा प्रामुख्याने पदाधिकाऱ्यांच्या वर्गणीच्या माध्यमातून साजरा केला जात असून, आजूबाजूच्या परिसरातून वर्गणीचे प्रमाण अत्यल्प आहे. ही बाब मंडळाच्या कार्यकर्त्यांची निष्ठा आणि उत्सवाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करते.
मंडळाच्या सांस्कृतिक वाटचालीतील आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे ‘हरी बोलची माऊली’ या मंडळाशी संबंधित गाण्याचे ओपनिंग झाले असून, ही संपूर्ण मंडळासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
गेली चार दशके परंपरा, संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि युवा शक्ती यांचा सुंदर संगम साधत ‘हरी बोल बाल मित्र मंडळ’ आपली वाटचाल सुरू ठेवत आहे. उत्सव केवळ साजरा न करता त्याला सामाजिक कार्याची जोड देण्याचा मंडळाचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.

Post a Comment
0 Comments