प्रमोद एन. चिंतलवार
✍🏻तालुका प्रतिनिधी गडचिरोल✍🏻 मो. नं. 9405133420
धानोरा : कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, धानोरा येथील विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण अंतर्गत आयोजित लोकनृत्य व भूमिका अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत विद्यालयाचा नावलौकिक वाढविला. विशेष म्हणजे, सलग तीन वर्षे लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत विद्यार्थिनींनी विजयाची हॅट्रिक साधली आहे.
तालुकास्तरीय लोकनृत्य तसेच भूमिका अभिनय या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले नामांकन निश्चित केले आहे.
लोकनृत्य स्पर्धेत इयत्ता नववीतील कु. इशिका सरकार, लावण्या सोनुले, सानिया लेनगुरे, अंजली जाडे, दिनू कावडे व वैष्णवी सोनुले यांनी सहभाग घेतला. तसेच भूमिका अभिनय स्पर्धेत हिरकण्या मोहर्ले, इशिका सरकार, कांचन सोनुले, माहेश्वरी कोराम व ज्ञानेश्वरी पुडो या विद्यार्थिनींनी आपल्या अभिनयाची प्रभावी छाप पाडली.
या विद्यार्थिनींना कु. कीर्ती फुंडे व सरिता वालकर या शिक्षिकांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे विद्यालयाला दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविता आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, मुख्याध्यापिका पौर्णिमा शिंपी तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षिकांचे अभिनंदन केले असून, आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments