Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

माजी जहाल नक्षलवाद्याला ‘पेसा’ मार्गदर्शक नेमल्याने गडचिरोलीत संतापाची लाट; सीताराम मडावी यांचा आंदोलनाचा इशारा



मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

गडचिरोली: - गोंडवाना विद्यापीठामार्फत पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभा मार्गदर्शक म्हणून आत्मसमर्पण केलेल्या जहाल नक्षलवादी नेत्याची नियुक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात गडचिरोली जिल्ह्यात तीव्र असंतोष पसरला आहे. सामाजिक कार्यकर्ते सीताराम मडावी यांनी या नियुक्तीवर कडाडून आक्षेप घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तीव्र विरोध दर्शवला असून, निर्णय मागे न घेतल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

‘निर्दोष लोकांच्या मारेकऱ्याचे मार्गदर्शन जनतेला अमान्य’

आपल्या निवेदनात सीताराम मडावी यांनी म्हटले आहे की, अनेक वर्षे देशविरोधी आणि समाजविरोधी कारवायांमध्ये सक्रिय असणाऱ्या मल्लोंजुन वेणुगोपाल राव उर्फ भूपती याने कित्येक सरपंच, पोलीस पाटील आणि निष्पाप सामाजिक कार्यकर्त्यांची ‘पोलीस खबऱ्या’ असा ठपका ठेवून निर्घृण हत्या केली आहे. विकासाचा आणि देशाचा उघड विरोध करणाऱ्या अशा व्यक्तीला आता अचानक ग्रामसभांचे मार्गदर्शक बनवणे म्हणजे जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांचे मार्गदर्शन गडचिरोलीची जनता आणि तरुण पिढी कधीही स्वीकारणार नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

जनतेच्या करातून मानधन देण्यास तीव्र विरोध

सदर माजी नक्षल नेत्याला ३० हजार रुपये मानधन देण्यावरूनही प्रशासनावर जोरदार तोफ डागण्यात आली आहे. जनतेच्या करातून आणि रॉयल्टीच्या पैशातून अशा व्यक्तीला मानधन देण्याचा अधिकार शासनाला नाही. हा निर्णय जनतेच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारा असून प्रशासनाने जनतेला गृहीत धरू नये, असा इशारा मडावी यांनी दिला.

तीव्र जनआंदोलनाची चेतावणी

गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक, पालक आणि लोकप्रतिनिधी या चुकीच्या निर्णयाला सडेतोड उत्तर देतील. शासनाने ही नियुक्ती तातडीने रद्द न केल्यास संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा थेट इशारा प्रजानिष्ठ समाजसेवक सीताराम मडावी यांनी दिला आहे. या घडामोडींमुळे स्थानिक पातळीवर आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments