अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
7798185755
तलासरी : वृत्ती फाउंडेशन आणि अल्टस यांच्या सहकार्याने, पंचायत समिती तलासरी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ‘पोषण माह’ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, लाभार्थी महिला, माता तसेच शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पोषणाबाबत जनजागृती करणे आणि दैनंदिन आहारात पौष्टिक व आरोग्यदायी सवयींचा समावेश करण्याचा संदेश देण्यासाठी विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये पौष्टिक पाककृती स्पर्धा, रानभाज्या स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्थानिक व पारंपरिक रानभाज्यांचे पौष्टिक व औषधी महत्त्व, तसेच संतुलित आहाराचे महत्त्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून कुपोषणमुक्ती आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला.
कार्यक्रमादरम्यान अंगणवाडीतील बालक, गरोदर व स्तनदा माता तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये पोषणाच्या चांगल्या सवयी रुजविण्यावर विशेष भर देण्यात आला. स्थानिक पातळीवर उपलब्ध ताज्या भाज्या व पौष्टिक घटकांचा दैनंदिन आहारात योग्य वापर करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे मा. सरपंच श्री. लक्ष्मण गोरखना, बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. सतीश पोळ, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती पल्लवी नाडकर्णी, मुख्याध्यापक श्री. किरण वळवी, श्री. संजय प्रधान, पर्यवेक्षिका श्रीमती गीता शैलश गोंधळेकर, वृत्ती फाउंडेशनचे श्री. रवींद्र कांबळे यांच्यासह शिक्षक, ICDS कर्मचारी, अंगणवाडी सेविका, माता व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व विभागांच्या समन्वयातून आणि उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागातून ‘पोषण माह’ कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Post a Comment
0 Comments