विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील हालेवारा परिसरात सुरू असलेल्या रस्ता बांधकामाच्या कामावरून झालेल्या वादानंतर दोन पत्रकारांविरुद्ध दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाल्याची घटना समोर आली आहे. आलापल्ली येथील पत्रकार महेश गुडेंटीवार व आनंद दहागांवकर यांच्याविरुद्ध हालेवारा तसेच एटापल्ली पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार रोजी दुपारी सुमारे ४.३० ते ५ वाजताच्या दरम्यान एटापल्ली-कसनसूर मार्गावरील हालेवारा गावाजवळ लॉयड्स मेटल्स कंपनीकडून रस्ता बांधकामाचे काम सुरू होते. यावेळी पत्रकार महेश गुडेंटीवार व आनंद दहागांवकर आणि कामावर असलेले कंपनीचे अभियंते आशीष गंपावार व मनिकंदन यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वादाचे रूपांतर धक्काबुकीपर्यंत झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेनंतर लॉयड्स मेटल्स कंपनीचे अभियंता आशीष गंपावार यांनी हालेवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत शिवीगाळ तसेच मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत. या तक्रारीच्या आधारे महेश गुडेंटीवार व आनंद दहागांवकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 351 आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी सुमारे ६ ते ७ वाजताच्या दरम्यान एटापल्लीपासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या एकरा नाल्याजवळ या दोन्ही पत्रकारांविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. रेहाना नसरू शेख (वय ३६) यांनी एटापल्ली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत दारूच्या नशेत शिवीगाळ व छेडछाड केल्याचा आरोप केला आहे.
या तक्रारीवरून महेश गुडेंटीवार व आनंद दहागांवकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 77, 79 तसेच 296 व 85 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एका दिवसात दोन वेगवेगळ्या घटनांप्रकरणी एकाच दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने या प्रकरणाची परिसरात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, दोन्ही प्रकरणांतील आरोपांची सत्यता तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, केवळ तक्रारीत आरोप करण्यात आल्याने संबंधित व्यक्तींना दोषी ठरविता येणार नाही. घटनास्थळावरील परिस्थिती, संबंधित व्यक्तींचे जबाब तसेच उपलब्ध पुरावे यांची पडताळणी केल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास एटापल्ली पोलीस ठाण्याचे ठाणेदार मच्छिंद्र नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती आहे. तपासाअंती उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Post a Comment
0 Comments