Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

जिमलगट्टा येथे कोंबड्यांच्या खुराड्यात शिरला भलामोठा अजगर साप;



 चार कोंबड्या फस्त करून बसला ठाण मांडून, वनविभागाने केली सुटका.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

 जिमलगट्टा 

येथील रहिवासी बापु डुरके यांच्या घरामागील कोंबड्यांच्या खुराड्यात आज सकाळी एका अजगर सापाने शिरकाव करून चार कोंबड्या फस्त केल्याची धक्कादायक घटना घडली. कोंबड्या गिळून केल्यानंतर हा साप खुराड्यातच सुस्त पडून राहिला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी बापु डुरके आपल्या खुराड्याकडे गेले असता त्यांना तिथे चार कोंबड्या गायब झाल्याचा भास आला होता आणि एक मोठा साप सुस्त अवस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले. सापाला पाहून कुटुंबियांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बापु डुरके यांनी क्षणाचाही विलंब न करता सकाळी ठीक ०८:३० वाजता जिमलगट्टा येथील वनक्षेत्र साहाय्यक (RO) कार्यालयात जाऊन घटनेची सविस्तर माहिती दिली.

वनक्षेत्र साहाय्यक मेश्राम मॅडम यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सूत्रे हलवली. त्यांनी त्वरित वनरक्षक शुभम चिट्टीवार व अमोल सोनवणे यांना फोनवरून संपर्क साधून बापु डुरके यांच्या घरी पाचारण केले.

माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या कौशल्याने आणि खबरदारीने सापाला कोणतीही इजा न पोहोचवता पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्याची कार्यवाही केली. वनविभागाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे डुरके कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असून वनअधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments