मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
मो. 8208166961
एटापल्ली : पुरसलगोंदी ग्रामपंचायत अंतर्गत बोडमेटा गावातील नागरिकांनी कॉम्रेड सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) यांना गावात बोलावून सभा घेतली. यावेळी ग्रामस्थांनी गावातील रस्त्याची गंभीर समस्या मांडत, बोडमेटा ते आलेंगा फाटा रस्ता मंजूर करून देण्यासाठी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालावे, अशी विनंती केली.
बोडमेटा गावाकडे जाण्यासाठी सध्या जंगलातील पायवाटेचा वापर करावा लागत असून, योग्य वाहतुकीयोग्य रस्ता नसल्याने नागरिकांना अनेक वर्षांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या मागणीची दखल घेत कॉ. सचिन मोतकुरवार यांनी उपविभागीय अधिकारी, एटापल्ली यांच्याकडे निवेदन देऊन बोडमेटा ते आलेंगा फाटा हा माती-मुरूम रस्ता जिल्हा खनिकर्म निधी (DMF) मधून मंजूर करून तातडीने बांधकाम सुरू करण्याची मागणी केली आहे.
रस्त्याअभावी आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेणे कठीण होत असून, रुग्णवाहिकेलाही गावापर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात. गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध व अपंग नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात जंगलातील पायवाट चिखलमय व निसरडी होत असल्याने सर्पदंश, अपघात किंवा इतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या अडचणी आणखी वाढतात.
विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी तसेच शेतकरी व मजुरांना शेतीमाल, कृषी साहित्य व इतर आवश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाजारपेठ, आरोग्य केंद्र, बँक व शासकीय कार्यालयांपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च वाढत आहे. रस्त्याअभावी गावाच्या सर्वांगीण विकासावरही परिणाम होत आहे.
खाण क्षेत्रापासून जवळ असूनही विकासापासून दूर
बोडमेटा गाव हे सुरजागड खाण क्षेत्रापासून अंदाजे ५ ते ७ किलोमीटर अंतरावर आहे. खाण क्षेत्राच्या इतक्या जवळ असूनही गाव आजही मूलभूत विकासाच्या सुविधांपासून दूर आहे. खाणकामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असताना आणि शासनाला महसूल तसेच जिल्हा खनिकर्म निधी (DMF) प्राप्त होत असताना बोडमेटा गावातील नागरिकांना आजही योग्य रस्त्याची सुविधा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे CPIने म्हटले आहे.
खाणकामामुळे प्रभावित क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी DMF व प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना (PMKKKY) अंतर्गत निधीचा उपयोग करण्याची तरतूद आहे. त्यामुळे बोडमेटा ते आलेंगा फाटा हा अत्यावश्यक संपर्क रस्ता DMF निधीतून विकसित करावा, अशी मागणी CPIने केली आहे.
कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “बोडमेटा गावातील नागरिकांनी मला गावात बोलावून सभा घेतली आणि रस्त्याची समस्या माझ्या निदर्शनास आणून दिली. सुरजागड खाण क्षेत्रापासून अवघ्या ५ ते ७ किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव आजही विकासापासून दूर आहे. खाणप्रभावित परिसरातील नागरिकांना मूलभूत रस्त्यासाठी वंचित ठेवता कामा नये. DMF निधीचा उपयोग खाणप्रभावित भागातील नागरिकांच्या मूलभूत विकासासाठी झाला पाहिजे. प्रशासनाने बोडमेटा ते आलेंगा फाटा रस्त्याची तातडीने पाहणी करून प्रस्ताव तयार करावा आणि रस्त्याचे काम सुरू करावे.”
CPIच्या वतीने बोडमेटा ते आलेंगा फाटा मार्गाची प्रत्यक्ष पाहणी व मोजणी करावी, DMF निधीतून रस्त्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठवावा, PMKKKY अंतर्गत आवश्यक निधीची तरतूद करावी, अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घ्यावी आणि प्रत्यक्ष बांधकाम तातडीने सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच रस्त्याच्या पाहणीपासून निधी मंजुरी, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, कार्यादेश आणि प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यवाहीचा अहवाल CPIला लेखी स्वरूपात देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीवर तातडीने कार्यवाही न झाल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देताना CPI जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार तसेच बोडमेटा गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments