रसायनगळतीने खळबळ; सर्व यंत्रणांच्या समन्वयाने लिकेज कंट्रोल ऑपरेशन यशस्वी
तेजपाल जैन
कोलाड तालुका प्रतिनिधी
मो. 8928847695
कोलाड : - रायगड जिल्ह्यातील पुगाव गावाच्या हद्दीत मंगळवारी (१५ सप्टेंबर) पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास जेएनपीटी येथून महाडच्या दिशेने धोकादायक रसायनाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला. या कंटेनरमधून 2-Methyl-2-propanol (tert-Butanol) हे अत्यंत ज्वलनशील रसायन वाहून नेले जात होते. त्यामुळे अपघातानंतर परिसरात संभाव्य मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच SVRSS, येरुणकर क्रेन सर्विस, महामार्ग पोलीस केंद्राची टीम, हायवे पोलीस, कोलाड पोलीस प्रशासन तसेच संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी पोहोचल्यानंतर कंटेनरची काळजीपूर्वक तपासणी करण्यात आली. यावेळी कंटेनरच्या मॅनहोलमधून ज्वलनशील रसायनाची गळती होत असल्याचे निदर्शनास आले. प्राथमिक अंदाजानुसार काही प्रमाणात रसायन बाहेर पडले होते.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित पथकांनी तातडीने मॅनहोलवरील गळती नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या. रसायन अत्यंत ज्वलनशील असल्याने घटनास्थळी कोणत्याही प्रकारची ठिणगी, आग किंवा इतर प्रज्वलनाचा स्रोत निर्माण होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. बचावकार्य आणि लिकेज कंट्रोल ऑपरेशन अत्यंत काळजीपूर्वक व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करत राबविण्यात आले.
सुरक्षेच्या दृष्टीने घटनास्थळी ‘NO MOBILE ZONE’ लागू करण्यात आला. तसेच संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि बचाव पथकांना सुरक्षितपणे काम करता यावे यासाठी मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खांब ते कोलाड दरम्यानची वाहतूक सुमारे एक तास थांबविण्यात आली. त्यामुळे घटनास्थळी अनावश्यक गर्दी होण्यासही आळा बसला.
दरम्यान, संबंधित यंत्रणांच्या पथकांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत गळती नियंत्रणात आणली. कंटेनरमधील धोकादायक रसायनामुळे निर्माण होऊ शकणारा आग किंवा स्फोटाचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रत्येक कार्यवाही अत्यंत सावधगिरीने करण्यात आली.
या संपूर्ण कारवाईदरम्यान पोलिस प्रशासन, महामार्ग यंत्रणा, क्रेन सेवा आणि संबंधित पथकांमध्ये उत्तम समन्वय दिसून आला. सर्व यंत्रणांच्या तत्परतेमुळे आणि सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना, जीवितहानी तसेच मोठ्या प्रमाणावरील मालमत्तेचे नुकसान टळले.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई–गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना हा अपघात घडल्याने प्रशासनाच्या तातडीच्या प्रतिसादाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Post a Comment
0 Comments