Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

तलासरीत दुसऱ्या दिवशीही संप सुरूच; पंचायत समिती कार्यालयसमोर शाळा भरून विद्यार्थ्यांचा सहभाग सरकारी शाळा वाचवण्यासाठी डीवायएफआयचे तलासरीत बेमुदत धरणे आंदोलन




अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 

7798185755


तलासरी: सरकारी शाळांचे अस्तित्व धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आणि शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात ‘डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया’ (DYFI) च्या नेतृत्वाखाली तलासरी येथे सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. तलासरी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलकांनी चक्क ‘शाळा’ भरवून प्रशासनाचा अभिनव पद्धतीने निषेध केला. इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गांसाठी तातडीने शिक्षक उपलब्ध करून दिले जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला असून, मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


विद्यार्थी आणि पालकांचा संताप, पंचायत समितीसमोर भरली शाळागेल्या अनेक महिन्यांपासून तलासरी तालुक्यातील काही सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. विशेषतः नववी आणि दहावीसारख्या महत्त्वाच्या वर्षांमधील विद्यार्थ्यांचे शिक्षकांअभावी मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षण विभागाकडे वारंवार दाद मागूनही कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर डीवायएफआयने आंदोलनाचे हत्यार उपसले. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे, संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून थेट पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच ठाण मांडले आणि तिथेच वर्ग भरवले.


शिक्षक मिळेपर्यंत माघार नाही!आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही प्रशासनाकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला. गोरगरिबांची मुले शिकणाऱ्या सरकारी शाळा जाणीवपूर्वक बंद पाडण्याचा हा डाव आहे,असा आरोप यावेळी पालकांनी केला. डीवायएफआयच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी हक्काचे शिक्षक मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.


आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारादोन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे तलासरी शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने येत्या दिवसांत तालुक्यातील इतर शाळांमधील विद्यार्थी आणि पालकांना एकत्र करून हे आंदोलन संपूर्ण जिल्हाभर अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा डीवायएफआय आणि मुख्य आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनामुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर सर्वसामान्य नागरिकांमधून प्रचंड चीड व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments