Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

एटापल्लीच्या 7 प्रमुख प्रश्नांवर माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम आक्रमक; प्रशासनाला रस्ता रोकोचा इशारा



विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931

एटापल्ली तालुक्यातील जनतेचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा, अन्यथा रस्ता रोको आंदोलन छेडू, असा इशारा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम (हलगेकर) यांनी प्रशासनाला दिला आहे.

त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले असून आश्वासन नको तर ठोस कृती हवी, अशी भूमिका घेतली आहे.


*प्रमुख 7 मागण्या अशा -*


*1. आठवडी बाजारातील वाहतूक कोंडी:*

मंगळवारी आठवडी बाजारामुळे शहरात मोठी गर्दी होते. पार्किंग व्यवस्था नसल्याने ट्रॅफिक जाम होतो. रुग्णवाहिका अडकण्याची भीती आहे. त्यामुळे बाजारासाठी स्वतंत्र पार्किंग व वाहतूक नियोजन करावे.


*2. शेडमाके चौक ते नाका धुळीचे साम्राज्य:*

या मार्गावर प्रचंड धूळ उडत असल्याने नागरिक, दुकानदार, विद्यार्थी त्रस्त आहेत. रोज पाणी फवारणी आणि रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी.


*3. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नाहीत:*

एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने दुर्गम भागातील रुग्णांचे हाल होत आहेत. तातडीने पदे भरावीत.


*4. वाघांचा वावर - नागरिकांत भीती:*

तालुक्यातील गावांमध्ये वाघांचा वावर वाढला आहे. शेतकरी घाबरले आहेत. कॅमेरा ट्रॅप, वनगस्त वाढवावी आणि गरज पडल्यास पिंजरे लावावेत.


*5. शेतकऱ्यांचा बोनस व कर्जमाफी:*

शेतकऱ्यांचा प्रलंबित बोनस तातडीने खात्यात जमा करावा आणि कर्जमाफीबाबत शासनाने निर्णय घ्यावा.


*6. स्मार्ट मीटरचा गोंधळ:*

स्मार्ट मीटरमुळे बिल वाढत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. हे मीटर काढून जुने पारंपरिक मीटर लावावेत.


*7. लोह खदान आणि ग्रामसभा - सर्वात महत्त्वाचा मुद्दा:*

एटापल्लीतील प्रस्तावित व मंजूर लोह खदानला मंजुरी देताना -

- स्थानिक ग्रामसभा आणि समित्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे.

- स्थानिक आदिवासींना विश्वासात घ्यावे.

- शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊ नये, योग्य मोबदला द्यावा.

- बाहेरच्या लोकांनी ग्रामसभेत हस्तक्षेप केल्यास खदान विरोधात उग्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.


*"रस्ते, आरोग्य, शेतकरी, वीज आणि सुरक्षा - आता आश्वासन नको, कृती हवी,"* असे भाग्यश्री आत्राम म्हणाल्या.


या सर्व प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन कार्यवाही करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments