मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी, दि. ४ सप्टेंबर २०२६ : अहेरी आगाराला शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आगारातील विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी प्रवाशांना भेडसावणाऱ्या अनेक अडचणी समोर आल्या.
अहेरी आगारात चार्जिंग पॉइंट उपलब्ध नसल्यामुळे ‘शिवाई’ बससेवा आलापल्लीपर्यंत येऊन पुन्हा परत जाते, ही बाब अत्यंत गंभीर असून अहेरीकरांसाठी दुर्दैवी आहे. अहेरी येथे चार्जिंग पॉइंट मंजूर होऊन जवळपास एक वर्ष झाले असतानाही त्याचे काम अद्याप संथगतीने सुरू आहे. त्यामुळे संबंधित जबाबदार व्यक्तींवर चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच अहेरी आगारात ड्रायव्हर व कंडक्टरची कमतरता, बसेसची अपुरी संख्या, जुन्या व खराब अवस्थेतील बसेसमुळे प्रवाशांना होणारा त्रास आणि नवीन बसेसची अपुरी उपलब्धता अशा अनेक समस्या निदर्शनास आल्या.
अहेरी आगारातून ग्रामीण भागातील विद्यार्थी, कर्मचारी, नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात, चालक-वाहकांची रिक्त पदे भरावीत, जुन्या बसेसची दुरुस्ती अथवा त्या बदलून नवीन बसेस सुरू कराव्यात आणि चार्जिंग पॉइंटचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी नगरपंचायत अध्यक्षा रोजा करपेत, शिवसेना शहर प्रमुख विनेश तोटावार, शहर संघटक आयुष मामीडवार, माजी जिल्हा उपाध्यक्ष दुर्वे सर, शिवसेना जिल्हा वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष बिर्जू गेडाम, शिवसैनिक प्रमोद ढेरे सर तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते.
“अहेरी आगारातील समस्या केवळ प्रवाशांच्या गैरसोयीचा विषय नसून त्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहेत. संबंधित प्रशासनाने या समस्यांची तातडीने दखल घेऊन ठोस कार्यवाही करावी,” अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Post a Comment
0 Comments