Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

कोंडमळ्यात गौरी-गणपतींचे उत्साहात विसर्जन; गणेशभक्तांना जनजागृती सेवा संस्थेचा खाऊ, फ्रुटीचा प्रसाद



कोंडमळा प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर

मो.9323662619

कोंडमळा :- गणरायांचे ज्या जल्लोषात आगमन झाले, त्याच उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात कोंडमळा गावातील घरगुती गौरी-गणपतींचे थाटात विसर्जन करण्यात आले. चिपळूण तालुक्यातील कोंडमळा येथील ग्रामस्थांच्या घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन पुलाजवळील नदीपात्रात ढोल-ताशांच्या गजरात व ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात उत्साहात झाले.

    गणेश विसर्जनासाठी सकाळपासूनच ग्रामस्थांची लगबग सुरू होती. घरातील गणरायाला पारंपरिक पद्धतीने निरोप देण्यासाठी महिला, पुरुष, युवक तसेच लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाच्या मिरवणुका विसर्जनस्थळी दाखल होत होत्या. यावेळी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

    दरम्यान, गणेश विसर्जनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच त्यांना अल्पोपहार व थंड पेयाची सुविधा मिळावी, यासाठी जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने मोफत खाऊ व थंड पेय फ्रुटीचे वाटप करण्यात आले. विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना या उपक्रमाचा मोठा लाभ झाला.

    जनजागृती सेवा संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार, डोंबिवली येथील उषा हॉस्पिटॅलिटीचे संचालक तसेच कोंडमळा गावचे रहिवासी अरविंद सुर्वे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात भक्तिभावासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. विसर्जनासाठी आलेल्या गणेशभक्तांना खाऊ आणि थंड फ्रुटीचे वाटप करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

    या उपक्रमासाठी स्थानिक दुकानदार मंगेश घाणेकर व सुनील घाणेकर यांचे सहकार्य लाभले. सामाजिक उपक्रमातून गणेशोत्सवाचा आनंद अधिक द्विगुणित करण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे अरविंद सुर्वे यांनी सांगितले.

    गणेश विसर्जन सोहळ्यादरम्यान जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या या उपक्रमाचे कोंडमळा तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. गणेशभक्तांना सेवा देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा उपक्रम आदर्शवत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments