Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

गणेशोत्सवात डीजेवर पोलिसांची करडी नजर; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई तलासरीत २५० गणेश मंडळांची समन्वय बैठक; शांतता-सुव्यवस्थेसाठी प्रशासनाचा सज्जतेचा संदेश





अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 

7798185755


आगामी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सुव्यवस्थित वातावरणात पार पडावा, यासाठी तलासरी पोलीस ठाणे, तालुका प्रशासन आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त समन्वय बैठक तहसीलदार कार्यालयात घेण्यात आली. बैठकीत डीजे व ध्वनीक्षेपकाच्या नियमभंगावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला.


डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला तहसीलदार अमोल पाठक, गटविकास अधिकारी डॉ. वैभव सापळे, तलासरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी रवि गोरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, महावितरण, महामार्ग विभागाचे अधिकारी, पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य तसेच विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीला सुमारे २०० ते २५० गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीचे मार्ग पूर्वनियोजित करून प्रशासनाला माहिती देणे, वाहतूक कोंडी टाळणे, स्वयंसेवकांची नियुक्ती करणे, महिला व मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आणि मंडप व विद्युत व्यवस्थेची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सोशल मीडियावर अफवा अथवा जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित न करण्याचे आवाहन करण्यात आले.


डीजे व ध्वनीक्षेपकाच्या वापराबाबत लागू असलेले कायदे, शासनाचे आदेश आणि न्यायालयीन निर्देशांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांनी दिला. गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचेही आवाहन करण्यात आले.


गणेशोत्सव शांततेत आणि सामाजिक सलोखा कायम ठेवून साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासन, तालुका प्रशासन, गणेश मंडळे आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी केले.

Post a Comment

0 Comments