Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

ग्रामीण टपाल जीवन विम्याने दोन कुटुंबांना लाखोंचा आधार अल्प हप्त्यांत विमा संरक्षण; मृत्यूनंतर वारसांना मिळाली मोठी रक्कम, पोस्टाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन




अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 

7798185755


ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक सुरक्षितता देण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यापैकी ग्रामीण टपाल जीवन विमा योजना संकटाच्या काळात कुटुंबाला आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना ठरत आहे. कासा परिसरातील दोन विमाधारकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना विम्याची रक्कम देण्यात आली. या माध्यमातून दोन कुटुंबांना लाखो रुपयांचा आर्थिक आधार मिळाला.


कासा पोलीस ठाण्यात पोलीस म्हणून कार्यरत असताना दिवंगत शर्मिला कांटेला यांनी भारतीय टपाल विभागाची पाच लाख रुपयांची पोस्टल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती. पॉलिसी घेतल्यानंतर त्यांनी अवघे तीन हप्ते भरले. दरमहा २ हजार ७५ रुपये याप्रमाणे त्यांनी एकूण ६ हजार २२५ रुपये भरले होते. मात्र, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पॉलिसीच्या नियमानुसार मूळ विमा रक्कम आणि बोनस मिळून त्यांच्या कुटुंबाला ५ लाख २६ हजार रुपये देण्यात आले. शर्मिला काटेला यांच्या पश्चात पती आणि दोन मुली असा परिवार आहे.


दुसऱ्या प्रकरणात दिवंगत काशीराम बाळू नडगे हे तलवाडा रुग्णालयात सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. त्यांनी दोन लाख रुपयांची विमा पॉलिसी घेतली होती. जवळपास तीन वर्षे त्यांनी विम्याचे हप्ते भरले. त्यांच्या निधनानंतर विमा दावा मंजूर होऊन त्यांच्या कुटुंबाला २ लाख ९५ हजार १७२ रुपये देण्यात आले.


कासा येथील पोस्ट कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात दोन्ही विमाधारकांच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम प्रदान करण्यात आली. यावेळी डाक निरीक्षक हिलाल खान, सुनील चौधरी, शाखा पोस्टमास्तर ममता वझे, कासा पोस्टमास्तर रवी सैनी, पोस्टमन तसेच नागरिक उपस्थित होते. दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा लाभ वितरित करण्यात आला.


ग्रामीण भागात योजनांचा अधिक प्रचार गरजेचा


भारतीय टपाल विभागाच्या अनेक योजना नागरिकांच्या हितासाठी कार्यरत असल्या, तरी ग्रामीण भागात त्यांचा अपेक्षित प्रमाणात प्रचार आणि प्रसार होत नसल्याने अनेक नागरिक या योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे ग्रामीण जनतेने टपाल विभागाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.


यावेळी डाक निरीक्षक हिलाल खान यांनी सांगितले की, ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण घेता येते. या योजनेचे हप्ते तुलनेने कमी असून नागरिकांना आर्थिक सुरक्षितता मिळते. ग्रामीण भागातील नागरिकांनी टपाल विभागाच्या जीवन विम्यासह इतर विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.


दरम्यान, दिवंगत शर्मिला काटेला यांच्या बहिणीनेही ग्रामीण नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “प्रत्येकाने ग्रामीण टपाल जीवन विमा किंवा पोस्टल लाईफ इन्शुरन्समध्ये विमा संरक्षण घ्यावे. भविष्यात अचानक संकट आले तर आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळू शकतो.”


अल्प हप्त्यांत घेतलेले विमा संरक्षण मृत्यूनंतरही कुटुंबाच्या पाठीशी उभे राहू शकते, याची प्रचिती कासा परिसरातील या दोन प्रकरणांतून आली आहे.

Post a Comment

0 Comments