विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931
एटापल्ली : सेवा संकल्प अभियानांतर्गत श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळ एटापल्ली तथा नगरपंचायत कार्यालय एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने बस स्थानक परिसरात रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान शिबिरात मंडळाचे सदस्य तसेच नागरिक मिळून एकूण २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे काही महिलांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे उदाहरण निर्माण केले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले.
त्याचबरोबर आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात परिसरातील अनेक नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराच्या आयोजनासाठी आरोग्य विभाग तसेच नगरपंचायत कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती व सहकार्य लाभले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळाचे अध्यक्ष राघवेंद्र सुल्वावार, उपाध्यक्ष संपत पैडाकुलवार, सचिव अनिकेत मामीडवार, सहसचिव तनुज बल्लेवार तसेच मंडळाचे सदस्य अक्षय गहेरवार, अनिकेत मोहुर्ले व अभिनव पैडाकुलवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments