Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

शिक्षणासाठी जंगलातून प्रवास गावात शाळा, सीजेपाचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या गावभेटीत वास्तव उघड



विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931


एटापल्ली, (ता. प्र.). शिक्षणासाठी शाळेची पायरी चढण्याचे वय असलेल्या तीन विद्यार्थिनींना सध्या दररोज जंगलाची वाट तुडवावी लागत आहे. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम कोसा, आर्लेंगा गावात शाळेची इमारत असतानाही शिक्षक उपलब्ध नसल्याने या विद्यार्थिनींना तब्बल दोन किमी अंतरावरील कोहका येथील शाळेत जावे लागत आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर वन्यप्राण्यांचा धोका असून परिसरात वाघाची दहशत आहे.


काँक्राच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी गुरुवारी गडचिरोली दौऱ्यादरम्यान कोसा, आर्लेंगा येथे भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. विद्यार्थिनींसोबत कोहका शाळेपर्यंतचा प्रवास करून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.


गावात शाळा असूनही विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावात का जावे लागते? हा प्रश्न या भेटीत केंद्रस्थानी आला. कोसा, आर्लेंगा येथील शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत असून शिक्षक नसल्यामुळे येथील तीन विद्यार्थिनींना कोहका येथील शाळेत पाठविले जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. कोसा, आर्लेंगा येथील शाळा कोहका येथे भरविण्यात येत असल्याचा फलकही तेथे लावण्यात आला आहे. २७ विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन शिक्षक कार्यरत असून पहिली ते चौथीचे वर्ग एकाच खोलीत भरविले जात असल्याचे पाहणीत दिसून आले.


बंद शाळेची ग्रामसेवकांनी केली साफसफाई


दरम्यान, येथील बंद शाळेची ग्रामसेवकांकडून साफसफाई करण्यात आल्याची माहितीही समोर आली. मात्र, बंद शाळेची साफसफाई झाली, आता शिक्षण कधी सुरू होणार? हा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.


शाळेची इमारत गावात, विद्यार्थी दुसऱ्या गावात आणि त्यासाठी जंगलवाटेचा प्रवास ही परिस्थिती बदलण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची गरज आहे.


> *"कोसा आर्लेंगा येथील शाळा लवकरच नियमित सुरू करण्यात येणार आहे. तसेच शाळेसाठी नवीन इमारतही मंजूर झाली असून, येत्या काही दिवसांत आवश्यक कार्यवाही पूर्ण करून शाळेची परिस्थिती सुरळीत करण्यात येईल."*

> *- एच. बुरडकर, गट शिक्षणाधिकारी, पंस, एटापल्ली*


जंगलातून जाताना सर्पदंश झाला किंवा एखाद्या हिंस्र प्राण्याने हल्ला केला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल दीपके यांनी उपस्थित केला. मंत्री-अधिकाऱ्यांच्या मुलांना अशा शाळेत पाठवणार का? ; मंत्री, वरिष्ठ अधिकारी किंवा प्रशासनातील एखाद्या जबाबदार व्यक्तीच्या मुलाला अशाच परिस्थितीत शिक्षणासाठी रोज जंगलातून २ किमी पायी पाठवण्याची वेळ आली असती, तर त्यांनी अशीच व्यवस्था स्वीकारली असती का? असा सवाल दीपके यांनी उपस्थित केला.


*प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित!*


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असल्या, तरी शाळेच्या मूलभूत सुविधांची स्थिती अद्यापही चिंताजनक असल्याचे दुसरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाहणीत समोर आले. दीपके यांनी गडचिरोली दौऱ्यादरम्यान शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

Post a Comment

0 Comments