‘पीएम विश्वकर्मा’मुळे पारंपरिक कारागिरांना कौशल्य, आधुनिक साधने व अर्थसहाय्याची संधी
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते लाभार्थ्यांना टूल किट व कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण
प्रमोद एन. चिंतलवार
तालुका प्रतिनिधी गडचिरोली
मो. 9405133420
गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली येथील नियोजन भवनात ‘पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळावा’ तसेच पारंपरिक कारागीर व शिल्पकारांच्या टूल किट आणि कर्ज मंजुरी पत्र वाटप सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. गडचिरोली जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवून आर्थिक विकासाला गती देण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या श्रमाला उत्पादकतेची जोड देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पारंपरिक कारागीर, शिल्पकार आणि असंघटित क्षेत्रातील कष्टकरी घटकांना कौशल्य, आधुनिक साधने, प्रशिक्षण व अर्थसहाय्य उपलब्ध करून स्वयंरोजगार आणि व्यवसायवृद्धीसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने ‘पीएम विश्वकर्मा’सारख्या योजना महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
"असंघटित क्षेत्राला विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यावर भर"
‘पीएम विश्वकर्मा’, ‘पीएम स्वनिधी’ आणि ‘ई-श्रम पोर्टल’च्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील घटकांची नोंदणी करून त्यांना विविध शासकीय योजना व सामाजिक सुरक्षेशी जोडण्याचे काम सुरू आहे. पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधीच्या माध्यमातून अर्थसहाय्याची संधी उपलब्ध झाली असून, ई-श्रम पोर्टलवर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाल्याचे सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.
"कौशल्य, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला चालना"
प्रत्येक व्यक्तीला सरकारी किंवा खासगी नोकरी देणे शक्य नसले तरी कौशल्याधारित व्यवसाय, स्वयंरोजगार, उत्पादन आणि उद्योजकतेच्या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करता येतात. देशातील मनुष्यबळाला योग्य कौशल्य व प्रशिक्षणाची जोड दिल्यास आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत त्याचा मोठा वाटा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
पारंपरिक कारागिरांनी योजनेतून मिळणारे प्रशिक्षण, आधुनिक साधने आणि आर्थिक सहाय्याचा प्रभावी उपयोग करून आपल्या पारंपरिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञान व व्यवसायाची जोड द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
"गडचिरोलीच्या आर्थिक विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज"
जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी नागरिक, युवक, शेतकरी, कारागीर, कामगार आणि उद्योजकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती व कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ झाली तर त्याचा सकारात्मक परिणाम जिल्ह्याच्या आर्थिक विकासावर होईल, असे ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.
समाजातील प्रश्नांवर ठोस उपाय शोधणे आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी व अपेक्षा शासनापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा"
मार्गदर्शनाच्या प्रारंभी ॲड. आशिष जयस्वाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. लोकसेवेसाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचा त्यांचा दृष्टिकोन प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात टूल किट व कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी भास्कर मेश्राम, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक प्रशांत धोंगळे, संबंधित विभागांचे अधिकारी, पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी व पारंपरिक कारागीर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments