रुग्णालयातील विविध विभागांचा आढावा; रिक्त पदांवर लवकर नियुक्ती करण्याचे आश्वासन
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी : अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयास गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. रवी गावंडे यांनी आज नुकतीच भेट देऊन रुग्णालयाची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून उपलब्ध आरोग्य सुविधा, मनुष्यबळ, रुग्णसेवा तसेच रुग्णालयातील विविध समस्यांची माहिती जाणून घेतली.
भेटीदरम्यान डॉ. गावंडे यांनी रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेतली. रुग्णांची विचारपूस करून त्यांना मिळणाऱ्या उपचार व आरोग्य सुविधांबाबत माहिती घेतली. तसेच डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रुग्णालयातील दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली.
यानंतर रुग्णालयातील विविध विषयांवर आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये उपलब्ध वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, रिक्त पदे, रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच रुग्णालयाच्या कामकाजासंदर्भातील विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.
अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील काही पदे अद्याप रिक्त असल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होऊ नये यासाठी उर्वरित रिक्त पदांवर लवकरात लवकर नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा चिकित्सक डॉ. रवी गावंडे यांनी यावेळी दिले.
जिल्हा चिकित्सकांनी प्रत्यक्ष रुग्णालयात भेट देऊन रुग्ण व कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्याने रुग्णालयातील विविध समस्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments