Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहाराच्या भूलथापांना बळी पडू नका – मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे



प्रमोद चिंतलवार तालुका प्रतिनिधी गडचिरोली 

 मो. नं.9405133420

गडचिरोली, दि. २ सप्टेंबर (जिमाका) : जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व सामाजिक प्रवर्गानुसार भरण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेतील एकूण १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची तयार करण्यात आली आहे. ही सूची जिल्हा परिषद गडचिरोलीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने ३१ डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण झालेल्या अनुक्रम प्रकरणांची तपासणी करून पूर्ण माहिती उपलब्ध असलेल्या एकूण १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची तयार केली आहे. संबंधित उमेदवारांना अधिकृत माहितीसाठी जिल्हा परिषद गडचिरोलीचे अधिकृत संकेतस्थळ – https://zpgadchiroli.maharashtra.gov.in तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या फलकावरील माहिती पाहता येईल.

प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता तसेच सामाजिक प्रवर्गानुसार समुपदेशन प्रक्रियेद्वारे पदस्थापनेचा लाभ मिळवून देण्याबाबतच्या कोणत्याही गैरप्रकारांना किंवा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.

विशेषतः कोणत्याही व्यक्तीकडून रकमेची मागणी करण्यात आल्यास किंवा नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास उमेदवारांनी थेट जिल्हा परिषद प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

यासाठी अनिकेत पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), जिल्हा परिषद, गडचिरोली – भ्रमणध्वनी क्र. ९७६७५०१५३० यांच्याशी संपर्क साधता येईल.

उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंदर्भातील माहितीसाठी केवळ अधिकृत माध्यमांवर विश्वास ठेवावा आणि कोणत्याही आर्थिक प्रलोभनाला अथवा भूलथापांना बळी पडू नये, असे जिल्हा परिषद प्रशासनाने आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments