Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

टीएचआरला नवी चव, पोषणाला नवी दिशा! वाघाडीत १४ गटांची ‘पोषण रसोई’ स्पर्धा




अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 

7798185755


डहाणू, दि. ९ सप्टेंबर, अंगणवाडीच्या माध्यमातून बालके, गरोदर माता व स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या टीएचआरबाबत (Take Home Ration) समाजात असलेले गैरसमज दूर करून त्याचा योग्य आणि प्रभावी वापर करण्याचा संदेश देण्यासाठी वाघाडी समाजहॉल येथे ‘पोषण रसोई स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले. पोषण माह २०२६ निमित्त आरोहन संस्था व के. कॉर्प चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला माता, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि आशा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


चळणी, धरमपूर, मोडगाव, तवा, मुरबाड, वांगर्जे, वाघाडी, पिंपळशेत, दाभाडी, सायवन आणि बापुगाव या गावांमधील १४ गटांनी स्पर्धेत सहभाग घेतला. सहभागी गटांनी टीएचआरसोबत स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असलेल्या पौष्टिक खाद्यघटकांचा वापर करून विविध नाविन्यपूर्ण पदार्थ तयार केले.


यामध्ये पौष्टिक लाडू, पौष्टिक पराठा, रव्याची वडी, लोहयुक्त गोड वडे, मल्टीग्रेन शेवगा भजी, लापशी, खिचडी, सुकडी, बिस्किट आणि हलवा अशा विविध पदार्थांचा समावेश होता. कमी खर्चात उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून बालके, गरोदर माता व स्तनदा मातांसाठी चविष्ट आणि पोषणयुक्त पदार्थ तयार करता येतात, हे सहभागी महिलांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.


स्पर्धेदरम्यान केवळ पदार्थांची मांडणी न करता प्रत्येक गटाने वापरलेले घटक, रेसिपी तयार करण्याची पद्धत, त्यातील पोषणमूल्य तसेच बालक व मातांसाठी त्याचे महत्त्व याबाबत माहिती दिली. त्यामुळे उपस्थित माता व अंगणवाडी कार्यकर्त्यांना टीएचआरचा दैनंदिन आहारात अधिक प्रभावीपणे वापर करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळाली.


यावेळी सायवन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महिंद्र नवरे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. घरच्या घरी उपलब्ध खाद्यघटकांपासून पौष्टिक आहार तयार करण्याची सवय कुटुंबांनी विकसित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. भुईमूग, खुरासणी यांसारख्या स्थानिक पौष्टिक घटकांचा आहारात समावेश करण्याबरोबरच अंड्यासारख्या पोषणमूल्य असलेल्या पदार्थांचा योग्य प्रमाणात वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. बालकाच्या पोषणाची पायाभरणी मातेच्या गर्भधारणेपासूनच होत असल्याने गरोदरपणापासून मातेला संतुलित व पोषणयुक्त आहार मिळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


कृषी विज्ञान केंद्र, कोसबाडच्या पोषणतज्ज्ञ रूपाली देशमुख यांनी सहभागी सर्व गटांचे कौतुक केले. टीएचआरचा नियमित व योग्य वापर होणे आवश्यक असून अंगणवाडीतून मिळणारा आहार केवळ एका वेळच्या आहारापुरता मर्यादित न ठेवता बालकाच्या एकूण आहारपद्धतीचा भाग बनविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. फास्ट फूड व कमी पोषणमूल्य असलेल्या पदार्थांचा वापर कमी करून घरगुती, स्थानिक आणि पौष्टिक पदार्थांना प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. योग्य पोषणामुळे बालकाच्या शारीरिक वाढीसोबतच बौद्धिक व मानसिक विकासालाही चालना मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.


कार्यक्रमाला पोषणतज्ज्ञ रूपाली देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. महिंद्र नवरे, ग्रामपंचायत सरपंच प्रशांत सातवी, अंगणवाडी मुख्य सेविका पूर्वा पाटील, वाघाडी उपकेंद्राच्या डॉ. अंकिता भोये आणि आरोहन प्रकल्प व्यवस्थापक सुजाता आयरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


पाहुण्यांनी सर्व १४ गटांच्या रेसिपींची प्रत्यक्ष पाहणी करून पदार्थांची चव, वापरलेले घटक, पोषणमूल्य, तयार करण्याची पद्धत तसेच बालक व मातांसाठी असलेली उपयुक्तता या निकषांवर मूल्यांकन केले.


मूल्यांकनानंतर वाघाडी कोथलपाडा गटाने प्रथम क्रमांक, चळणी बेलपाडा गटाने द्वितीय क्रमांक, तर मोडगाव खोरीपाडा, पिंपळशेत लोहारपाडा आणि मुरबाड गेटीपाडा या गटांनी तृतीय क्रमांक पटकावला. सहभागी सर्व गटांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


कार्यक्रमाची प्रस्तावना आरोहन प्रकल्प व्यवस्थापक सुजाता आयरकर यांनी केली, तर सूत्रसंचालन सूर्यकांत गावित यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोहन संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. अंगणवाडी कार्यकर्त्या, माता आणि आशा कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


‘टीएचआर म्हणजे केवळ घरी नेण्यासाठी मिळणारा आहार नसून, त्याचा योग्य वापर करून रोजच्या आहारात विविध पौष्टिक पदार्थ तयार करता येतात,’ हा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून समुदायापर्यंत पोहोचला. स्थानिक खाद्यघटकांचा वापर, कमी खर्चात पौष्टिक पदार्थ तयार करण्याच्या पद्धती आणि बालक व मातांच्या पोषणाचे महत्त्व याबाबत प्रत्यक्ष कृतीतून जनजागृती करण्यात आली.


पोषण ही केवळ अंगणवाडीची जबाबदारी नसून कुटुंब, माता, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या आणि संपूर्ण समुदायाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश देत ‘पोषणयुक्त कुटुंब - निरोगी बालक - सक्षम समाज’ या संकल्पनेला या उपक्रमाने बळ दिले.

Post a Comment

0 Comments