Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात महामार्गावर रास्ता रोको दोन तास वाहतूक ठप्प; महावितरणचे लेखी आश्वासन, बिल तपासणीसाठी १५ दिवसांची विशेष मोहीम




अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 

7798185755


महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला विरोध करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (१० सप्टेंबर) मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भरपावसात झालेल्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे ५ ते ६ हजार नागरिक सहभागी झाल्याने दुपारी १२.३० ते २.३० या कालावधीत महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.


मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय नेते अशोक ढवळे, डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीसह विविध स्थानिक संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.


स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, तसेच ग्राहकांना पूर्वसूचना न देता मीटर बसविण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. सध्या बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून जुन्या पद्धतीचे मीटर कायम ठेवावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.


यापूर्वी डहाणू येथे झालेल्या आंदोलनात नागरिकांनी स्मार्ट मीटर काढून महावितरण कार्यालयात जमा केले होते. त्यानंतर पुन्हा स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला.


रास्ता रोकोनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. जुन्या मीटरच्या बिलांची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी १५ दिवसांची विशेष मोहीम राबविण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केली जाणार नाही, असे लेखी आश्वासन महावितरणकडून देण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.


ज्या ठिकाणी जुने मीटर कार्यरत आहेत, त्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसविले जाणार नाहीत, अशी माहिती आमदार विनोद निकोले यांनी दिली. महावितरणच्या आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

Post a Comment

0 Comments