कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन
विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931
एटापल्ली :- आगामी गणेशोत्सव आणि पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली शहर व परिसर शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा यासाठी पोलीस स्टेशन एटापल्लीच्या वतीने पोलीस प्रशासनाने शहरात रूट मार्च (पथसंचलन) आयोजित केला. दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत काढण्यात आलेल्या या रूट मार्चमुळे शहरात शिस्त आणि सुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रूट मार्चची सुरुवात पोलीस स्टेशन येथून होऊन राजीव गांधी चौक, मुख्य बस स्टॉप, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संस्कार पब्लिक स्कूल परिसर, इंदिरा वार्ड, बंगाली कॅम्प, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय परिसर, संविधान चौक तसेच मज्जीद रोड अशा प्रमुख व संवेदनशील मार्गावरून पथसंचलन करण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बर्गे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास बेले, पोलीस उपनिरीक्षक पायघन, पोलीस उपनिरीक्षक सुर्वेसे आणि महिला पोलीस उपनिरीक्षक शिरशिकर यांनी सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बर्गे यांनी केले.
अफवांवर विश्वास न ठेवता सण-उत्सव गुण्यागोविंदाने व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन एटापल्ली पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

Post a Comment
0 Comments