विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931
एटापल्ली (प्रतिनिधी) :- एटापल्ली तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या जारावंडी ग्रामपंचायतीचा कारभार सध्या पूर्णपणे वाऱ्यावर आहे. नियमित ग्रामसेवक नसल्याने सलग तीन वेळा ग्रामसभा तहकूब करावी लागल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जारावंडीचे ग्रामसेवक मनोज गेडाम यांच्याकडे सेवारी ग्रामपंचायतीचा अतिरिक्त प्रभार होता. सेवारीतील कथित अनियमितता प्रकरणानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. तेव्हापासून जारावंडीला नियमित ग्रामसेवकच नाही. मधल्या काळात कोडापे यांच्याकडे प्रभार देण्यात आला होता, मात्र त्यांनीही जारावंडीकडे येणार नसल्याचे लेखी गटविकास अधिकाऱ्यांना कळवले आहे.
आज दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी यापूर्वी तहकूब झालेली ग्रामसभा पुन्हा बोलावण्यात आली होती. गावातील प्रश्न मांडण्यासाठी नागरिक कामधंदे सोडून ग्रामपंचायतीत हजर झाले, मात्र ग्रामसेवकच गैरहजर असल्याने ग्रामसभा पुन्हा तहकूब करावी लागली.
ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा ठराव
वारंवार अशा प्रकारे ग्रामसभा तहकूब होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आजच्या ग्रामसभेत आक्रमक भूमिका घेतली. आठ दिवसांच्या आत नियमित ग्रामसेवक उपलब्ध करून न दिल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून बंद करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
> "ग्रामसेवकांनी ग्रामसभेवर बहिष्कार टाकला असल्याने जारावंडी येथील ग्रामसभेला ग्रामसेवक उपस्थित राहिले नाहीत."
> रवींद्र कुणघाडकर, विस्तार अधिकारी (पंचायत), पं.स. एटापल्ली
आता प्रशासन आठ दिवसांत काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जारावंडी गावाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments