Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

सरकारी शाळा वाचवा, शाळा सुधारा’; तलासरीत डीवायएफआयचे बेमुदत धरणे शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची मागणी; १६ मागण्यांसाठी आंदोलन




अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 

7798185755


 तलासरी तालुक्यातील सरकारी शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे, अपुऱ्या वर्गखोल्या तसेच मूलभूत सुविधांचा अभाव दूर करण्याच्या मागणीसाठी डीवायएफआय तलासरी तालुका समितीच्या वतीने मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) तलासरी पंचायत समितीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. ‘सरकारी शाळा वाचवा–शाळा सुधारा’ या प्रमुख मागणीसह एकूण १६ मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या आहेत.


तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत शिक्षकांची कमतरता आहे. विशेषतः नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक विषयांचे शिक्षक उपलब्ध नसलेल्या शाळांमध्ये तातडीने कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.


तसेच जीर्ण व धोकादायक शाळा इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करावी, विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार नवीन वर्गखोल्या बांधाव्यात, शुद्ध पिण्याचे पाणी, मुला-मुलींसाठी स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृहे, संरक्षण भिंत आणि सुरक्षित प्रवेशद्वार उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.


शाळांमध्ये वीज जोडणी, पुरेसा प्रकाश व पंखे, संगणक व इंटरनेट सुविधा, डिजिटल वर्गखोल्या, बाके-टेबल-खुर्च्या, विज्ञान प्रयोगशाळा व प्रयोग साहित्य, ग्रंथालय तसेच वाचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. खेळाच्या मैदानांचे सपाटीकरण व दुरुस्ती करून आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी आंदोलकांनी केली.


विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा परिसरातील धोकादायक झाडे, उघड्या विहिरी, विद्युत तारा आणि मोडकळीस आलेल्या भिंतींचे सर्वेक्षण करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. शाळा परिसर, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी नियमित स्वच्छता व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करून प्राथमिक उपचार पेटी व मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


तलासरी तालुक्यातील प्रत्येक सरकारी शाळेचे भौतिक व शैक्षणिक सुविधांच्या दृष्टीने सर्वेक्षण करून शाळानिहाय समस्या निश्चित कराव्यात आणि त्यावर उपाययोजनांसाठी वेळबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी डीवायएफआयने केली आहे. शिक्षकांची उपलब्धता, रिक्त पदे, वर्गखोल्या, पाणी, स्वच्छतागृहे, वीज, डिजिटल सुविधा, मैदान व संरक्षण भिंत यासह शाळांच्या मूलभूत सुविधांची सद्यस्थिती सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली.


‘सरकारी शाळा मजबूत करणे म्हणजे ग्रामीण व आदिवासी भागातील सामान्य कुटुंबातील मुलांचे भवितव्य मजबूत करणे होय,’ अशी भूमिका डीवायएफआयने मांडली. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.


“सरकारी शाळांमधील शिक्षकांची अपुरी पदे आणि मूलभूत सुविधांचा अभाव दूर होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार,” असा निर्धार डीवायएफआय तलासरी तालुका समितीने व्यक्त केला.


आंदोलनात डीवायएफआयचे राज्य उपाध्यक्ष साथी नंदकुमार हाडळ, राज्य सचिव मंडळ सदस्य सुरेश भोये, राज्य कमिटी सदस्य शरद उंबरशाडा, अनिल झीरवा, शोभना बेंदर यांच्यासह सुभाष दुमाडा, विलास ठाकरे, सुहास सुरती, जिग्नेश मोरे, दीपक ठाकरे, सुनील गोंड, रामदास वळवी, विजय बोदले, विवेक हाडळ, अरुण कानल, बाबू कुऱ्हाडा, संतोष सातवी, मनोज धाडगा, रमिला जवलिया, गीता वळवी, लक्ष्मण वाडु, रमन खरपडे, वसंत रजपूत आणि भरत खेभला आदी सहभागी झाले.

Post a Comment

0 Comments