मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
मो. 8208166961
एटापल्ली : - ग्रामपंचायत जवेली बु. अंतर्गत कन्हाळगाव ते कारका या गावांना जोडणारा अंदाजे ४ किलोमीटरचा रस्ता आजही योग्य प्रकारे उपलब्ध नसल्याने नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. जंगलातील पायवाटेसारख्या या मार्गावर पावसाळ्यात चिखल आणि घसरगुंडी निर्माण होत असल्याने गावकऱ्यांचा रोजचा प्रवास संकटमय बनला आहे.
या गंभीर समस्येमुळे त्रस्त झालेल्या कन्हाळगाव येथील नागरिकांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे गडचिरोली जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांना गावात बोलावून घेतले. गावकऱ्यांनी त्यांच्यासोबत बैठक घेऊन कन्हाळगाव–कारका रस्त्याची प्रत्यक्ष परिस्थिती आणि नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणी सांगितल्या. अनेक वर्षांपासून रस्त्याअभावी होत असलेला त्रास मांडत हा प्रश्न प्रशासनाकडे प्रभावीपणे उचलून धरावा आणि रस्ता मंजूर करून घेण्यासाठी मदत करावी, अशी विनंती गावकऱ्यांनी कॉ. मोतकुरवार यांच्याकडे केली.
जंगलातून जाणाऱ्या या मार्गावर साप, विंचू तसेच इतर वन्यप्राण्यांचा धोका कायम असतो. पावसाळ्यात चिखलामुळे दुचाकी घसरण्याची शक्यता वाढते. एखादा नागरिक गंभीर आजारी पडल्यास किंवा अपघात झाल्यास रुग्णाला वेळेत दवाखान्यात पोहोचविणे कठीण होते. विशेषतः गरोदर महिला, वृद्ध, लहान मुले आणि दिव्यांग नागरिकांना या रस्त्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याच्या समस्येचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खराब आणि चिखलमय मार्गातून प्रवास करावा लागतो. बाजारपेठ, आरोग्यसेवा, शासकीय कार्यालये आणि इतर दैनंदिन गरजांसाठी नागरिकांना याच मार्गावर अवलंबून राहावे लागत आहे.
गावकऱ्यांची समस्या ऐकल्यानंतर कॉ. सचिन मोतकुरवार यांनी हा प्रश्न भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून प्रशासनाकडे उचलून धरला. कन्हाळगाव ते कारका या अंदाजे ४ किलोमीटर मार्गाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून अंदाजपत्रक तयार करावे आणि मातीमुरूम रस्त्याच्या कामाला प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देऊन काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी उपविभागीय अधिकारी, एटापल्ली यांच्याकडे करण्यात आली.
कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “कन्हाळगावच्या नागरिकांनी मला गावात बोलावून त्यांच्या रस्त्याची गंभीर समस्या सांगितली आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी मदत मागितली. गावकऱ्यांना आजही चिखल, जंगल आणि जीवघेण्या परिस्थितीतून प्रवास करावा लागत असेल तर ही बाब गंभीर आहे. रस्ता ही कोणतीही चैनीची मागणी नसून नागरिकांच्या आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षिततेशी जोडलेली मूलभूत गरज आहे. प्रशासनाने कन्हाळगाव–कारका रस्त्याला तातडीने मंजुरी देऊन काम सुरू करावे. नागरिकांना त्यांचा हक्क मिळेपर्यंत आम्ही हा प्रश्न सोडणार नाही.”
प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास कन्हाळगावच्या नागरिकांना सोबत घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही कॉ. सचिन मोतकुरवार यांनी दिला.

Post a Comment
0 Comments