मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
मो. 8208166961
एटापल्ली : ग्रामपंचायत नागुलवाडी अंतर्गत नागुलवाडी गावातील नाल्यांची मागील पाच वर्षांहून अधिक काळ नियमित सफाई व गाळ उपसा करण्यात न आल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व घाण साचल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नव्हता. या समस्येची दखल घेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पंचायत समिती, एटापल्लीकडे निवेदन देऊन सात दिवसांत नाली सफाई व गाळ उपसा करण्याचे अल्टिमेटम दिले होते.
CPIच्या मागणीची प्रशासनाने दखल घेत नागुलवाडी गावातील नाल्यांची सफाई व गाळ उपशाचे काम आता सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून नाल्यांच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गावातील नागरिकांनी कॉ. सचिन मोतकुरवार यांना नागुलवाडी येथे आमंत्रित करून नाल्यांची दुरवस्था प्रत्यक्ष दाखवली होती. नागरिकांनी नाल्यांची सफाई व गाळ उपसा करून देण्यासाठी मदत करण्याची मागणी केली होती. त्यानंतर CPIच्या वतीने गावातील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचायत समिती, एटापल्लीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तातडीने नाली सफाई व गाळ उपशाचे काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.
नाल्यांमध्ये साचलेला गाळ व कचरा यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नव्हता. तसेच दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तातडीने नाली सफाई करण्याची मागणी CPIने केली होती.
“नागुलवाडीतील नागरिकांनी मला गावात बोलावून नाल्यांची परिस्थिती दाखवली होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेत आम्ही प्रशासनाकडे सात दिवसांत नाली सफाई करण्याची मागणी केली. आता सफाईचे काम सुरू झाले आहे, ही नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे. गावातील सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा,” असे CPIचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले.
CPIच्या पाठपुराव्यामुळे नाली सफाईचे काम सुरू झाल्याने नागुलवाडीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, गावातील उर्वरित सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करून गाळाची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागुलवाडीतील नाली सफाईचे काम सुरू झाल्याबद्दल गावातील नागरिकांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आभार व्यक्त केले. नागरिकांनी आपली समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन सात दिवसांचे अल्टिमेटम दिल्याबद्दल CPIचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानले.
यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, कॉ. सुरज जककुलवार, जिल्हा सदस्य, भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच नागुलवाडी गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments