Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

बोडमेट्यात योजना कागदावर, नागरिकांच्या घरात मात्र पाण्याची बारीक धार; CPI आक्रमक




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

मो. 8208166961


एटापल्ली : ग्रामपंचायत पुरसलगोंदी अंतर्गत असलेल्या बोडमेटा गावातील नागरिकांना शासनाच्या विविध पाणीपुरवठा योजनांचा लाभ मिळत असल्याचे कागदोपत्री चित्र असले, तरी प्रत्यक्षात अनेक घरांमध्ये पुरेसे पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजनांमध्येच अनेक त्रुटी असल्याचा मुद्दा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने उपस्थित केला आहे.


बोडमेटा हे DMF क्षेत्रातील तसेच सुरजागड लोहखदान परिसरातील गाव असून या भागाच्या विकासासाठी विविध शासकीय योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, गावातील नागरिकांना आजही मूलभूत पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


गावात जल जीवन मिशन कार्यक्रम सन 2022-23 अंतर्गत सौर ऊर्जा आधारित नळ पाणीपुरवठा योजना तसेच ठक्कर बाप्पा आदिवासी घटक सुधारणा कार्यक्रम सन 2018-19 अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. मात्र या दोन्ही योजनांची योग्य देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने त्याचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळत नसल्याचे CPIने निदर्शनास आणले आहे.


अनेक घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचत नाही. काही ठिकाणी नळ तुटलेले आहेत, अंतर्गत पाइपलाइनमध्ये गळती आहे, तर अनेक घरांमध्ये पाण्याची अत्यंत बारीक धार येत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागत नाहीत. पाणीपुरवठा टाकी, सौर पंप, मोटार, व्हॉल्व्ह आणि पाइपलाइनची नियमित देखभाल न झाल्याने संपूर्ण यंत्रणाच प्रभावित झाल्याचे सांगण्यात आले.


गावातील नागरिकांनी आपली पाणीपुरवठ्याची समस्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. सचिन मोतकुरवार यांच्यासमोर मांडून या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली. नागरिकांच्या समस्येची दखल घेत कॉ. मोतकुरवार यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, भामरागड यांच्याकडे निवेदन सादर करून दोन्ही पाणीपुरवठा योजनांची प्रत्यक्ष पाहणी व तांत्रिक तपासणी करण्याची मागणी केली आहे.


योजनांची मुख्य व अंतर्गत पाइपलाइन तपासून गळती दूर करावी, तुटलेले नळ व नळ जोडण्या बदलण्यात याव्यात, कमी दाबाने पाणी येणाऱ्या घरांमध्ये पाण्याचा दाब तपासून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


तसेच सौर पंप, सोलर यंत्रणा, पाण्याची टाकी, मोटार, व्हॉल्व्ह व इतर उपकरणांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याबरोबरच योजनांच्या कामाची गुणवत्ता, वापरलेले साहित्य, मंजूर निधी आणि झालेला खर्च यांची तांत्रिक व प्रशासकीय तपासणी करण्याची मागणी CPIने केली आहे.


“पिण्याचे पाणी हा नागरिकांचा मूलभूत प्रश्न आहे. सुरजागड लोहखदान परिसरात असूनही बोडमेटा गावातील नागरिकांना जर पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल, तर ही गंभीर बाब आहे. शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्याचा प्रत्यक्ष लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून सर्व दोष दूर करावेत,” अशी भूमिका कॉ. सचिन मोतकुरवार यांनी व्यक्त केली.


पाण्याची गुणवत्ता तपासून नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि नियमित पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच भविष्यात योजना बंद पडू नयेत यासाठी कायमस्वरूपी देखभाल-दुरुस्तीची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.


या मागणीला समर्थन देण्यासाठी बोडमेटा गावातील नागरिक भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी CPIच्या माध्यमातून आपली समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून पाणीपुरवठ्याची व्यवस्था तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली. प्रत्येक घरापर्यंत नियमित, पुरेशा दाबाने आणि शुद्ध पाणी पोहोचले पाहिजे, अशी भूमिका नागरिकांनी यावेळी मांडली.


“नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लोकशाही व कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा CPIच्या वतीने देण्यात आला आहे.


या निवेदनावर कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, गडचिरोली तथा राज्य उपाध्यक्ष, AIYF महाराष्ट्र यांच्या स्वाक्षरी असून बोडमेटा गावातील नागरिकांच्या समर्थनाने ही मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments