९वी-१०वीसाठी २१ सप्टेंबरपर्यंत शिक्षक नियुक्तीचे लेखी आश्वासन
अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
7798185755
तलासरी, ११ सप्टेंबर : तलासरी तालुक्यातील सरकारी शाळांमधील शिक्षकांची कमतरता, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या तसेच शाळांच्या भौतिक व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांसाठी DYFI तलासरी तालुका कमिटीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या “सरकारी शाळा वाचवा – शाळा सुधारा” मोहिमेला अखेर यश आले आहे. प्रशासनाकडून ९वी व १०वीच्या वर्गांसाठी आवश्यक शिक्षकांची २१ सप्टेंबर २०२६ पर्यंत नियुक्ती करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
प्रशासनाने मागण्यांकडे ठोसपणे लक्ष न दिल्याने DYFIच्या वतीने ८ सप्टेंबरपासून तलासरी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले होते. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या मध्यस्थीने प्रशासनासोबत प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेनंतर प्रशासनाने ९वी व १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शिक्षक नियुक्त करण्याचे लेखी आश्वासन दिले.
याशिवाय शिक्षणाशी संबंधित इतर मागण्या तसेच शाळांमधील भौतिक व पायाभूत सुविधांचे प्रश्नही लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
या आंदोलनात DYFI व SFIच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने सहभाग घेतला. जनवादी महिला संघटना, अखिल भारतीय किसान सभा आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
“सरकारी शाळा वाचवा – शाळा सुधारा” या मोहिमेतील हा विजय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी झालेल्या संघर्षाचा विजय असल्याचे DYFIकडून सांगण्यात आले.
आंदोलनादरम्यान सहकार्य केल्याबद्दल पोलीस प्रशासन तसेच आंदोलनाची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना व्यापक प्रसिद्धी दिल्याबद्दल प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे DYFI तलासरी तालुका कमिटीने आभार मानले आहेत.
— DYFI तलासरी तालुका कमिटी

Post a Comment
0 Comments