Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

अहेरी महिला व बाल रुग्णालयात १० डॉक्टरांकडून उत्तम सेवा उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा सुरळीत; इतर डॉक्टरांची नियुक्ती लवकरच — जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे

 



मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.


अहेरी : अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच महिला व बाल रुग्णालयातील आरोग्यसेवा सध्या सुरळीत सुरू असून, रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. महिला व बाल रुग्णालयात सध्या एकूण १० डॉक्टर रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा देत असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

अहेरी महिला व बाल रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता तसेच रुग्णांना होणाऱ्या अडचणींबाबत यापूर्वी विविध स्तरांवर चर्चा झाली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत. सध्या रुग्णालयात उपलब्ध डॉक्टरांकडून नियमितपणे रुग्ण तपासणी, उपचार तसेच आवश्यक वैद्यकीय सेवा दिल्या जात आहेत.

याबाबत बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांनी सांगितले की, “सध्या अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि महिला व बाल रुग्णालयात कोणतीही मोठी अडचण नाही. उपलब्ध डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्यात येत आहे. रुग्णालयातील आवश्यक पदांवर इतर डॉक्टरांची नियुक्तीही लवकरच करण्यात येणार आहे.”

अहेरी परिसरातील नागरिकांसाठी महिला व बाल रुग्णालय हे महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. ग्रामीण व दुर्गम भागातून मोठ्या संख्येने महिला, बालक आणि इतर रुग्ण उपचारासाठी येथे येतात. त्यामुळे रुग्णालयात पुरेशा प्रमाणात डॉक्टर तसेच आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे.

डॉक्टरांची संख्या वाढविण्यासोबतच रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे येत्या काळात अहेरी परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, अहेरी महिला व बाल रुग्णालयात सध्या १० डॉक्टर सेवा देत असल्याची माहिती मिळाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. उर्वरित डॉक्टरांची नियुक्तीही लवकर झाल्यास रुग्णालयातील आरोग्यसेवा आणखी सक्षम होण्यास मदत होणार आहे.

Post a Comment

0 Comments