Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

काँग्रेस नेते डॉ,अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात बेमुदत आंदोलन सुरु.



 पदयात्रेत सहभागी होऊन आदिवासी बांधवांना दिला धीर.

अहेरी विधानसभा क्षेत्रात आजही सोयी सुविधे पासून कोसो दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी | अनेक वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या अहेरी तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या बेमुदत आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दर्शविला.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी या आंदोलनात सहभागी होत ग्रामस्थांच्या पदयात्रेत पायी चालत त्यांना धीर दिला.


खांदला ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या मरनेली,चिरेपल्ली,कोत्तागुडम,पत्तीगाव आणि खांदला या गावांना जोडणाऱ्या आलापल्ली ते खांदला या सुमारे २२ किलोमीटर रस्त्याच्या मागणीसाठी हजारो ग्रामस्थांनी अहेरीच्या दिशेने पायी कूच केले आहे.अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.


या आंदोलनात महिला, पुरुष, वृद्ध आणि शालेय विद्यार्थ्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग आहे.हजारोंच्या संख्येने आंदोलक जवळपास २० किलोमीटर पायी प्रवास करून आलापल्लीपर्यंत पोहोचले असून,तेथून त्यांनी अहेरीच्या दिशेने कूच केली आहे.डॉ.अजय कंकडालवार हे स्वतः या पदयात्रेत सहभागी झाले आणि आदिवासी बांधवांच्या मागण्यांना काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


अनेकदा निवेदने देऊनही रस्त्याचे काम मार्गी लागले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.रस्त्याअभावी या गावांतील नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.विशेषतः पावसाळ्यात नदी-नाले ओलांडून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजांसाठीही या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


आंदोलकांशी संवाद साधताना डॉ. कंकडालवार यांनी सांगितले की, आदिवासी भागातील रस्त्याचा प्रश्न हा केवळ रस्त्याचा नाही, तर जीवन-मरणाचा प्रश्न आहे. रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवता येत नाही,मुलांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो,ही परिस्थिती शासनाने गांभीर्याने घ्यायला हवी.काँग्रेस पक्ष या आंदोलनाच्या पूर्णपणे सोबत असून,रस्त्याचा प्रश्न सुटेपर्यंत आंदोलकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा विश्वास त्यांनी दिला.


सणोत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनावर ताण?


सध्या नवरात्रोत्सव, दसरा महोत्सव आणि दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताची जबाबदारी आहे.अशातच हजारो आंदोलक अहेरी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनावरील ताण वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.


एकीकडे विकासाच्या योजना आणि रस्त्यांच्या कामांवर भर दिला जात असताना दुसरीकडे दुर्गम भागातील गावांना मुख्य रस्त्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.वारंवार निवेदने देऊनही प्रश्न सुटत नसेल, तर नागरिकांनी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरायचे तरी किती काळ, असा सवाल उपस्थित होत आहे.


पावसाळ्यात नदी-नाले ओलांडताना ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण होत असताना प्रशासन आणखी किती काळ प्रतीक्षा करायला लावणार? हजारो आदिवासी बांधवांच्या या आंदोलनाची प्रशासन गांभीर्याने दखल घेऊन आलापल्ली ते खांदला रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments