Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या भोलू हांडवाला अशोक भोईर यांच्याकडून धान्याची मदत; संतोष देशमुख यांच्याकडून आर्थिक सहकार्य

 



१६ वर्षीय भोलूच्या मदतीसाठी दोन वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार; 


अरविंद बेंडगा

पालघर जिल्हा प्रतिनिधी

7798185755


डहाणू तालुक्यातील धानिवरी येथील १६ वर्षीय भोलू नरेश हांडवा याच्यावर आई-वडिलांचे छत्र हरपल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर आईच्या आधाराने जीवन जगणाऱ्या भोलूच्या आईचाही काही दिवसांपूर्वी धानिवरी येथील सुसरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे अल्पवयातच भोलू निराधार झाला असून त्याच्यासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कठीण प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर यांनी महिनाभर पुरेल इतके धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत केली, तर शिवसेना (शिंदे गट) चे डहाणू ग्रामीण तालुकाप्रमुख संतोष देशमुख यांनी भोलूला आर्थिक स्वरूपात मदत करून सहकार्याचा हात पुढे केला. दोन वेगवेगळ्या पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून गरजू मुलाला मदत केल्याने सामाजिक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.


भोलूचे वडील नरेश हांडवा यांचे सुमारे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर आई रसुला नरेश हांडवा हिने प्रतिकूल परिस्थितीत मुलाचा सांभाळ केला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने मायलेकांना उदरनिर्वाहासाठी गुजरातमधील नानापोंडा येथे विटभट्टीवर मजुरी करावी लागत होती. आर्थिक अडचणींमुळे भोलूला शिक्षणाची इच्छा असूनही शिक्षण पूर्ण करता आले नाही. मात्र, आई हाच त्याचा एकमेव आधार होता. काही दिवसांपूर्वी आई धानिवरी येथील सुसरी नदीत कपडे धुण्यासाठी गेली असता पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर भोलूच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र कायमचे हरपले.


भोलूच्या या दयनीय परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर यांनी त्याच्या घरी भेट देत मदतीचा हात पुढे केला. त्यांनी तांदूळ, कडधान्ये, तूरडाळ, खाद्यतेल, साखर, चवळी, वाटाणे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यामुळे भोलूच्या दैनंदिन गरजांसाठी काही काळाचा आधार मिळाला. त्याचबरोबर शिवसेना (शिंदे गट) चे डहाणू ग्रामीण तालुकाप्रमुख संतोष देशमुख यांनीही भोलूला आर्थिक मदत केली. या सहकार्यामुळे संकटात सापडलेल्या भोलूला दिलासा मिळाला आहे.


या मदतीच्या वेळी धानिवरी ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश कोरडा आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या एका अल्पवयीन मुलाच्या मदतीसाठी वेगवेगळ्या पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश समोर आला आहे.


मात्र, धान्य आणि आर्थिक मदतीने भोलूच्या तात्पुरत्या गरजा भागल्या तरी त्याच्या पुढील आयुष्याचा प्रश्न कायम आहे. त्याला नियमित उदरनिर्वाह, शिक्षणाची संधी आणि भविष्यात स्वावलंबी होण्यासाठी दीर्घकालीन सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, शिक्षणप्रेमी नागरिक आणि संबंधित प्रशासनाने पुढाकार घेऊन भोलूला आवश्यक मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अल्पवयात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या भोलूचे भविष्य अंधारात जाऊ नये, यासाठी समाजाने एकत्र येऊन त्याला आधार देणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments