Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पेन्शन अदालतमध्ये निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणींचे झाले निवारण

 


निवृत्तीवेतन प्रकरणे तयार करताना येणाऱ्या समस्यांवर मार्गदर्शन; पेन्शन प्रक्रियेतील नवीन बदलांची माहिती


प्रमोद एन. चिंतलवार 

तालुका प्रतिनिधी गडचिरोली 

मो. नं. 9405133420


गडचिरोली :निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणींचे निवारण आणि निवृत्तीवेतन प्रकरणे तयार करताना येणाऱ्या समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी महालेखाकार कार्यालय, नागपूर आणि जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली. या अदालतीत निवृत्तीवेतनधारकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्यात आले. तसेच पेन्शन प्रक्रियेतील नवीन बदलांची माहिती देण्यात आली.


महालेखाकार कार्यालय, नागपूर येथील वरिष्ठ लेखा अधिकारी श्रीमती मैथिली जगन्नाथन, सहाय्यक लेखा अधिकारी श्रीमती गीतांजली घांगरेकर आणि लेखापाल श्री प्रतापसिंग सिंगरौरे यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी निवृत्तीवेतन प्रक्रियेशी संबंधित विविध बाबींवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.


अदालतीदरम्यान निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या अडीअडचणी मांडल्या. तसेच विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवृत्तीवेतन प्रकरणे तयार करताना येणाऱ्या समस्यांबाबत प्रश्न उपस्थित केले. महालेखाकार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संबंधित प्रश्नांवर मार्गदर्शन करून शंकांचे निरसन केले. निवृत्तीवेतन प्रकरणांच्या कार्यवाहीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.


पेन्शन प्रक्रियेतील नवीन बदलांची माहिती देताना त्याअनुषंगाने प्रकरणे तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. या संयुक्त उपक्रमामुळे निवृत्तीवेतनधारक आणि निवृत्तीवेतन प्रकरणे हाताळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना महालेखाकार कार्यालयातील अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून आपल्या प्रश्नांचे निराकरण करून घेण्याची संधी मिळाली.


याप्रसंगी जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम, अपर कोषागार अधिकारी दीपक उके, उपलेखापाल भास्कर निंबेकर, लिपिक प्रवीण सोनवणे, माया मामिडवार, मयुरी दंडेवार यांच्यासह विविध कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन उपकोषागार अधिकारी नरेश लोंढे यांनी केले.

Post a Comment

0 Comments