जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा (RBSK) संयुक्त उपक्रम
"नागपूर येथील तज्ज्ञ बाल शल्यचिकित्सकांचे सहकार्य"
प्रमोद एन. चिंतलवार
तालुका प्रतिनिधी गडचिरोली
मो. नं. 9405133420
गडचिरोली : जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी दोन दिवसीय मोफत बाल शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे पार पडलेल्या या शिबिरात एकूण ३५ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
शिबिराच्या पहिल्या दिवशी २१, तर दुसऱ्या दिवशी १४ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या. यामध्ये प्रामुख्याने हॅर्निया, हायड्रोसील, फायमोसीस व सिस्ट यांसारख्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्या पात्र बालकांचा समावेश होता. या सर्व शस्त्रक्रिया गरजू बालकांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात आल्या.
"नागपूरच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे योगदान"
या शिबिरासाठी इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक सर्जन्स (IAPS) नागपूर शाखेचे वरिष्ठ बाल शल्यचिकित्सक डॉ. दीपक गोयल तसेच बाल शल्यचिकित्सक डॉ. मयूर सोनी यांची विशेष उपस्थिती लाभली. याशिवाय गडचिरोली सामान्य रुग्णालयातील शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, शस्त्रक्रियागृह (OT) प्रमुख, ओटी कर्मचारी व परिचारक यांच्या चमूने शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
"तपासणी व अचूक निदान"
जिल्ह्यातील विविध भागांत RBSK पथकांमार्फत प्राथमिक आरोग्य तपासणीदरम्यान संदर्भित करण्यात आलेली बालके, तसेच DEIC केंद्रात नोंदणीकृत बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल तपासणी करण्यात आली. त्यातील पात्र रुग्णांची निवड करून वेळेवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
ग्रामीण व दुर्गम भागातील बालकांमधील आजारांचे वेळीच अचूक निदान व्हावे आणि त्यांना वेळेत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा व शस्त्रक्रिया उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने DEIC व RBSK सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करत आहे. या यशस्वी शिबिरामुळे जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रवी गावंडे यांनी कळविले आहे.

Post a Comment
0 Comments